"सह्याद्री'ची विस्तारवाढ करणारच : बाळासाहेब पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

यशवंतनगर येथील कारखान्याच्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पाटील यांनी केल निर्धार व्यक्त. 

मसूर : कारखाना विस्तारवाढीसंदर्भात शासनाची चुकीची धोरणे आहेत. न्यायासाठी न्यायालयात जावे लागत आहे. अडचणींवर मात करून कारखान्याची विस्तारवाढ करण्याचा ठाम निर्धार सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. शासनाने आर्थिक साहाय्य दिल्याशिवाय ठिबक सिंचनाला महत्त्व येणार नाही, असे सांगून "सह्याद्री'ला अडचणीच्या काळात सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 
यशवंतनगर (ता. कऱ्हाड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. आमदार मोहनराव कदम, सातारा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सुनील माने, कऱ्हाड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, माजी सभापती शालन माळी, कारखान्याच्या उपाध्यक्षा लक्ष्मी गायकवाड, "सह्याद्री'चे संचालक, सभासद उपस्थित होते. आमदार पाटील म्हणाले, ""गेल्या हंगामात "सह्याद्री'चे ऊस गाळप जिल्ह्यात प्रथम व राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. सभासद, शेतकरी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे शक्‍य झाले. साडेसात मेट्रिक टन गाळप क्षमतेच्यावर गळीत करण्यात आले. मशिनरी क्षमतेचा वापर 102 टक्के झाला. सध्या साखरेला दर नसल्याने विक्री नाही, तरीदेखील दराबाबत न्याय देण्याची भूमिका आहे. उत्पादन व इतर खर्च कमी आहेत. कायद्यावर बोट न ठेवता सभासदाला नियमानुसार न्याय मिळणार आहे. कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात कारखाना कार्यक्षेत्रातील 38 मुलांना शिक्षणाची संधी मिळाली आहे. धनगरवाडी - हणबरवाडी पाणी उपसा योजनेसंदर्भात शासनाने दुर्लक्ष केले. धनगरवाडी, बानुगडेवाडी व हणबरवाडी, शहापूर योजनेसाठी 20 कोटी निधीची तरतूद केली. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी दिला. कारखान्याचे लेखापरीक्षण "अ' वर्ग आहे. ऊस कंपोस्ट सेंद्रीय खताचे वाटप करण्यात आले.'' 
अजित पाटील - चिखलीकर यांनी सभासदांना सात किलो साखर द्यावी, बीएस्सी ऍग्री महाविद्यालयाला परवानगी द्यावी, धनगरवाडी - हणबरवाडी योजनेचा अध्यादेश मागून घ्यावा, असे सूचित केले. भरत चव्हाण, संजीव देशपांडे, आनंद थोरात, उत्तम पिसाळ यांनी प्रश्न मांडले. सुरवातीला माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, माजी संचालक भगवानराव नलवडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी नोटीस वाचन केले. जी. व्ही. पिसाळ यांनी अहवाल वाचन केले. मानसिंगराव जगदाळे यांनी आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Sahyadri's expansion will be soon says balasaheb patil