हे अति झालं... कुणी आवरा साईबाबांना ट्रोल करणाऱ्यांना 

Sai Baba was a troll due to born place dispute
Sai Baba was a troll due to born place dispute

नगर : परभणी जिल्ह्यातील पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यापासून साईभक्तांमध्ये संभ्रमावस्था झाली आहे. कारण शिर्डीकरांनी जन्मभूमीच्या मुद्यावरून रान पेटवले आहे. साईबाबांच्या जन्मस्थानाचा कोठेच उल्लेख नाही. त्यामुळे पाथरीकरांनी जन्मभूमीचा दावा सोडून द्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. शिर्डीकरांनी "बंद' पाळत मुख्यमंत्र्यांनाही आपले विधान मागे घ्यायला लावले. पाथरी आणि शिर्डीमध्ये हा वादविवाद सुरू असतानाच बीडकरांनी, आमची भूमी बाबांची कर्मभूमी आहे, असा दावा केला आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी, बाबा इथे नोकरीला होते, असा अजब दावा केला आहे. 

रोज एक "ब्रेकिंग न्यूज'
या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि धार्मिक जीवन ढवळून निघाले आहे. त्यात राजकीय मंडळींनी उडी घेतल्याने, महाराष्ट्रात बाबांबद्दल रोज एक "ब्रेकिंग न्यूज' येत आहे. रोज कोणी ना कोणी दावा करीत असल्याने सोशल मीडियाने त्यांचा चांगलाच समाचार घ्यायला सुरवात केली आहे. त्यातूनच साईबाबांच्या जन्मभूमी अथवा कर्मभूमीविषयी दावा करणाऱ्यांना ट्रोल केले जात आहे. काहींनी बाबांनाही भरडले आहे. 

ट्रोल करणाऱ्यांचा हात कोण धरील
नको ती चर्चा करणाऱ्यांबद्दल पूर्वी "त्यांच्या तोंडाला कोण हात लावील' असे म्हटले जायचे. आता मात्र, "ट्रोल करणाऱ्यांचा हात कोण धरील,' अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 

हॅश टॅग करून सोशल मीडियात मोहीम
हे करणाऱ्या मंडळींमध्ये बाबांचे भक्तही आहेत. काही जण शिर्डीची बाजू लावून धरतात, तर काही पाथरी हीच जन्मभूमी असल्याचा दावा हॅश टॅग करून सोशल मीडियात मोहीम चालवीत आहेत. काही ट्रोलर मंडळींनी तर ताळतंत्रच सोडले आहे. 

काय, म्हणतात काय ट्रोलर? 
काल व्हायरल झालेला व्हिडिओ बीडचा असल्याची तुफान चर्चा सोशल मीडियाच्या कट्ट्यावर आहे. तो आधार घेत "बीडच्या नादात साईबाबा पेंडिंगला जातील, छ्या छ्या' अशा आशयाचा मजकूर टाकून ट्रोल केले जातेय. बीडचे समर्थक मात्र, "प्लीज, लवकर 100 कोटी रुपये द्या, जन्मभूमीपेक्षा कर्मभूमी महत्त्वाची असते' म्हणताहेत. त्यांना प्रत्युत्तर देताना मात्र काहींनी खालची पातळी गाठली आहे- "बीड ही कर्मभूमी नाही "काम'भूमी झालीय.' काही ट्रोलरने तर वेगळाच सूर आळवलाय. "डिटेन्शन सेंटरमध्ये जाणाऱ्यांत साईबाबांचा पहिला नंबर असेल,' असं लिहिण्याचा अगोचरपणाही काही नेटकरी मंडळी करीत आहेत. 

साईबाबा आमच्या गावात आले होते 
साईबाबांच्या पायाने पावन झालेल्या भूमीसाठी राज्य सरकारने निधी द्यायला सुरवात केल्याने वाद उफाळला आहे. त्यामुळे नगरकर मंडळींनी "साईबाबा नगरला नेहमी यायचे. आता तरी नगरचा उड्डाणपूल करा,' असे म्हणत सामाजिक प्रश्‍नाला हात घातला आहे. "बाबा, मला काल दिसले होते... स्वप्नात' अशी चेष्टेची टिप्पणीही करायला सुरवात झाली आहे. एकंदरीत, साईबाबांच्या नावाने हॅशटॅग मोहीम सुरू झालीय. जिकडेतिकडे साईबाबाच संचार करीत आहेत. 

भावनांना ठेच 
साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जगाला दिला आहे. सर्व स्तरात त्यांचे भक्त आहेत. या अशा या महान संताला सोशल मीडियात अशा पद्धतीने ट्रोल केले जात असल्याने निश्‍चितच साईभक्तांच्या तसेच संवेदनशील माणसांच्या भावनांना ठेच पोहतच आहे. त्यामुळे हे अति झालं राव, कुणी तरी आवरा बाबांना ट्रोल करणाऱ्यांना अशी आर्त सादही घातली जात आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com