Vidhan Sabha 2019 : पश्चिम महाराष्ट्रात भाजपमधील पहिली बंडखोरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी कागल मतदार संघातून शिवसेनेने युतीची घोषणा होण्यापुर्वीच माजी आमदार संजय घाटगे यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना पक्षाचा ए बी फॉर्म दिल्याने अस्वस्थ असलेले "म्हाडा' पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे कागलच्या मैदानात अपक्ष म्हणून उतरणार आहेत.

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी कागल मतदार संघातून शिवसेनेने युतीची घोषणा होण्यापुर्वीच माजी आमदार संजय घाटगे यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना पक्षाचा ए बी फॉर्म दिल्याने अस्वस्थ असलेले "म्हाडा' पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे कागलच्या मैदानात अपक्ष म्हणून उतरणार आहेत. या निवडणुकीच्या आड "म्हाडा' चे अध्यक्ष पद येत असल्याने या पदासह भाजपच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा त्यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. उद्या (ता. 1) श्री. घाटगे यांनी आपल्या गटाचा मेळावा बोलवला असून त्यात निवडणुकीसंदर्भातील आपली भुमिका स्पष्ट करणार आहेत. 

राज्यात 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर दोन वर्षांनी श्री. घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले "म्हाडा' पुणे विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विधानसभा निवडणूक कागलमधून लढण्याची तयारी त्यांनी गेल्या दोन-अडीच वर्षापासून सुरू केली आहे. यानिमित्ताने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तीन जंगी कार्यक्रम कागलमध्ये घेतले. या तिन्हीही कार्यक्रमात श्री. फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना तयारी करण्याचे सांगून अप्रत्यक्षरित्या उमेदवारी देण्याचेही संकेत दिले होते. गेल्या दोन-अडीच वर्षात श्री. घाटगे यांनी सरकारच्या माध्यमातून तालुक्‍यातील अनेक प्रश्‍न मार्गी लावले. 

भाजप-सेना युती झाली तरी श्री. घाटगे हेच उमेदवार असतील असे वातावरण तयार झाले होते. युतीची अधिकृत्त घोषणा झालेली नाही पण "आमचं ठरलंय' असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे वारंवार सांगत होते. प्रत्यक्षात काय ठरले आहे याचा "ट्रेलर' श्री. ठाकरे यांनी काल जिल्ह्यातील विद्यमान सहा आमदारांसह कागल व चंदगडची उमेदवारी जाहीर करून दाखवून दिले. कागलमधून माजी आमदार घाटगे यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे समजताच राजे गटात अस्वस्थता पसरली होती. त्यातून समरजितसिंह यांनी तातडीने मुंबई गाठली. आज त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन आपली भुमिका मांडली. पण त्यांना फारसा प्रतिसाद या दोघांकडून मिळाला नसल्याचे समजते. त्यातून त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेत या निर्णयाआड येणाऱ्या "म्हाडा' च्या अध्यक्ष पदाचाही राजीनामा श्री. फडणवीस यांच्याकडे दिला. 

शिवसेनेकडूनही लढण्याची तयारी 
शिवसेनेने माजी आमदार घाटगे यांना पक्षाचा ए बी फॉर्म दिला असला तरी समरजितसिंह घाटगे हेही सेनेच्या तिकिटावर लढण्यास तयार होते. शनिवारीच तशा घडामोडी सुरू होत्या. पण रविवारी अचानक शिवसेनेने त्यांच्याऐवजी संजय घाटगे यांना ए बी फॉर्म दिला. अजूनही 4 ऑक्‍टोंबरपर्यंत आपल्याला शिवसेनेचा ए बी फॉर्म दिला तर सेनेकडून लढू असेही श्री. घाटगे यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. 

भाजपच्या खेळीला धक्का 
कागल मतदार संघाचे विद्यमान आमदार व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना घेरण्याची रणनिती भाजपने त्यात विशेषतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आखली आहे. श्री. मुश्रीफ यांचा पराभव करायचा असेल तर एकास एक लढत हाच पर्याय आहे हेही श्री. पाटील यांना माहित आहे. त्यातून दोन वर्षापुर्वी त्यांनी समरजितसिंह यांना विधानपरिषदेची ऑफरही दिली होती, पण त्याला त्यांनी नकार दिला. आता उमेदवारी न मिळाल्याने समरजितसिंह यांनी लढण्याच्या घेतलेल्या निर्णयाने श्री. मुश्रीफ यांच्या विरोधातील भाजपच्या खेळीला धक्‍का बसला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samarjeetsingh Ghatge independent candidate