'हे' सरसावले शिवयारांची भवानी तलवार भारतात आणण्यासाठी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

सकाळी दहा वाजता भानजी राजेमहाडीक यांच्या वाड्यासमोरून शिवप्रतिमेचे पूजन करून पारंपरिक वाद्यवृंदाच्या साथीने ऐतिहासिक पालखी मिरवणूक सुरू झाली. पालखीचे स्वागत करण्यात आले. तेथे पदाधिकाऱ्यांनी शिव प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. 

तारळे (जि. सातारा)  : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगडा जाती, बारा बलुतेदार व अलुतेदार आदींसह सर्व जाती पंथाची माणसे सोबत घेत स्वराज्य उभे केले. युगप्रवर्तक व युगपुरुष शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे. येथे सर्व गुण्या गोविंदने नांदत आहेत. अशात कुठलाही कायदा आम्हाला देशाबाहेर काढू शकत नाही असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी केले. ते येथील ऐतिहासिक राजेमहाडीक घराण्याने सुरू केलेल्या शिवजयंतीच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अभिनेता शंतनू मोघे, उत्सव समिती अध्यक्ष भानजी राजेमहाडीक, कृष्णराजे राजेमहाडीक, अमित कदम, आदींसह राजेमहाडीक परिवाराची उपस्थिती होती.

प्रवीण गायकवाड म्हणाले, शिवजयंती हा उत्सव झाला पाहिजे घरोघरी गुढ्या व गोडधोड करून हा दिवस साजरा झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जावई तारळेचे राजेमहाडीक घराणे आहे. महाराजांच्या पदस्पर्शाने गाव पावन झाले आहे. त्यामुळे गावातील घरटी माणूस या उत्सवात सहभागी झाला पाहिजे. इतिहास शिकला, शोधला पाहिजे मात्र त्यात रमू नका. आज अठ्ठावीस देशात शिवजयंती साजरी होते. छत्रपती  शिवाजी महाराजांची भवानी तलवार आम्ही भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. शंतनू मोघे म्हणाले, ऐतिहासिक तारळे गावात शिवजयंती निमित्ताने येणे भाग्यचे आहे. शिवाजी महाराजांची भूमिका साकारली मात्र मी एक मावळा व शिवउपासक आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेने खराखुरा इतिहास घराघरात पोहोचला. शिवाजी महाराज ऐकणे, वाचणे समजून घेणे सोपे आहे. मात्र तशी वाटचाल करणे अवघड आहे. परंतु ती करायला आपण शिकले पाहिजे. शिवाजी व संभाजी महाराज हृदयावर कोरले आहेत. लहान मुलांना शिव शंभू चरित्र वाचावयास द्यायला हवे. प्रास्तविक कृष्णराजे राजेमहाडीक, सूत्रसंचालन नामदेवराव साळुंखे, आभार प्राध्यापक शिवसिंग राजेमहाडीक यांनी केले.

वाचा : या विषयी नो कमेन्टस्‌ : रामराजे नाईक निंबाळकर

तत्पूर्वी सकाळी दहा वाजता भानजी राजेमहाडीक यांच्या वाड्यासमोरून शिवप्रतिमेचे पूजन करून पारंपरिक वाद्यवृंदाच्या साथीने ऐतिहासिक पालखी मिरवणूक सुरू झाली. पालखीचे स्वागत करण्यात आले. तेथे पदाधिकाऱ्यांनी शिव प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. प्राथमिक मुलांच्या व मुलींची शाळा, राजेमहाडीक परिवार ग्रामस्थ यात सहभागी झाले होते. 1920 पासून सुरू झालेल्या या शिवजयंतीचे शंभरावे म्हणजे शताब्दी वर्ष होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Brigade President Pravin Gaikwad SaysStatement On CAA And NRC Law