संध्यादेवी कुपेकरांचं ठरलं, राष्ट्रवादी सोडणार

संध्यादेवी कुपेकरांचं ठरलं, राष्ट्रवादी सोडणार

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात जाण्याचे राज्यातील लोण कोल्हापुरातही पसरण्याची शक्‍यता असून, चंदगडच्या ‘राष्ट्रवादी’च्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांचंही राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचं ठरलं आहे. येत्या १० ऑगस्टपर्यंत कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात येईल. श्रीमती कुपेकर यांनी ‘राष्ट्रवादी’ला रामराम केलाच तर त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर भाजपच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. 

गेला महिनाभर श्रीमती कुपेकर राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार, अशी चर्चा सुरू आहे. ‘राष्ट्रवादी’ने नुकत्याच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यात श्रीमती कुपेकर यांनी आपण लढणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचे विश्‍वासू सहकारी अशी (कै.) बाबासाहेब कुपेकर यांची ओळख होती. त्यांच्या घरातून ‘राष्ट्रवादी’ सोडण्याची तयारी सुरू झाल्याने पक्षाला मोठा धक्का समजला जातो. 

भाजप-शिवसेना युती झाली तर हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. सध्या जिल्ह्यातील दहापैकी सहा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहेत. उर्वरित चारपैकी दोन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. उर्वरित दोन्हीही जागा भाजप आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत. त्यातून ही जागा भाजपला मिळाली तर श्रीमती कुपेकर यांच्या कन्या डॉ. बाभूळकर या उमेदवार असतील.

अलीकडचे भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री भरमू पाटील यांनी विनाअट प्रवेश केला आहे; तर गोपाळराव पाटील यांना निवडणुकीपेक्षा ‘दौलत’मध्ये जास्त रस आहे. डॉ. बाभूळकर यांचे सासर नागपूर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही गाव नागपूर आहे. फडणवीस व बाभूळकर कुटुंबाचे चांगले संबंध आहेत. त्यातून १५ दिवसांपूर्वी डॉ. बाभूळकर यांनी श्री. फडणवीस यांची भेटही घेतली आहे. त्यामुळेच श्रीमती कुपेकर यांच्यासह त्यांना मानणारा या मतदारसंघातील गट भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय - डॉ. बाभूळकर
या संदर्भात डॉ. नंदिनी बाभूळकर म्हणाल्या, ‘‘सध्या मी नागपूरमध्ये आहे. कोल्हापुरात रविवारी (ता. ४) आल्यानंतर १० ऑगस्टपर्यंत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. मी मुख्यमंत्र्यांना १५ दिवसांपूर्वी भेटले. एव्हीएच प्रकल्पाविरोधात आंदोलनादरम्यान दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com