Sangali: फलाटावर लागली खासगी वाहने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फलाटावर लागली खासगी वाहने

सांगली : फलाटावर लागली खासगी वाहने

सांगली : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विविध आगारांचे बसस्थानक काही दिवसांपासून ओस पडले आहेत. गृह विभाग (परिवहन)ने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बस स्थानकातून खासगी प्रवासी बस, स्कूल बस, मालवाहू वाहने आदींना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार सांगलीत आज खासगी बस, काळी-पिवळी टॅक्सी आदी गाड्यांनी बसस्थानकाचा ताबा घेतला. एसटीच्या फलाटावर काळी-पिवळी जीप लागल्याचे चित्र २०१७ च्या संपानंतर दुसऱ्यांदा दिसून आले. पोलिस बंदोबस्तात ही प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारला आहे. कृती समितीने देखील संपात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटीचे चाक जागेवरच थांबले आहे. जिल्ह्यात ४ हजार ७०० कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. दैनंदिन १३६६ फेऱ्या रद्द झाल्या आहेत. ऐन दिवाळी सणासुदीच्या काळात गावाकडे परतणाऱ्या प्रवाशांची आणि नियमित प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. राज्यात सर्वत्र हीच परिस्थिती आहे. त्यामुळे गृह विभाग (परिवहन) यांनी अधिसूचना काढून मोटार वाहन अधिनियमातील कलमानुसार खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपनीच्या बस आदी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

आदेशानुसार आज सकाळपासून सांगलीतील मध्यवर्ती बसस्थानकाच्या फलाटावर ३५ काळी-पिवळी टॅक्सी, जीप लावण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर दूरवरच्या प्रवासासाठी बसही दाखल झाल्या आहेत. सांगलीतून प्रमुख मार्गांवर या गाड्यांची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. एसटीच्या तिकिटाप्रमाणे यांना दर आकारण्याबाबत सूचना दिल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी खासगी तत्त्‍वावरील शिवशाही गाड्या भाजपने अडवल्या होत्या. त्यामुळे या खासगी गाड्या अडवल्या जाऊ नयेत म्हणून सांगलीतून पोलिस बंदोबस्तात गाड्या रवाना करण्यात आल्या. शहर पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, पोलिस उपनिरीक्षक दीपक माने यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत बंदोबस्त ठेवला आहे. तसेच आरटीओ उपनिरीक्षक प्रशांत इंगवले, किरण धुमाळ, गजानन कोळी, अश्विनी चव्हाण, नेहा विधाते, नंदा बारकोटे आदींसह काळी पिवळी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मजगे व पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात आजअखेर १६० निलंबित

जिल्ह्यातील ५८ जणांना संपाबद्दल निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आज आणखी १०२ जणांना निलंबित केले. त्यामुळे हा आकडा १६० पर्यंत गेला आहे. आज सांगली, तासगाव, विटा, शिराळा येथील प्रत्येकी पाच, आटपाडीचे ५१ आणि इस्लामपूरचे ३१ कर्मचारी निलंबित केले.

loading image
go to top