कोरोना नियंत्रणात पालकमंत्री अपयशी : म्हैसाळकर

प्रमोद जेरे
Tuesday, 22 September 2020

सांगली जिल्ह्यातील कोरोना साथीचा संसर्ग आणि मृत्यूदर पुणे, मुंबईपेक्षा आधिक आहे. ही परिस्थिती हाताळण्यात पालक मंत्री जयंत पाटील पूर्ण अपयशी ठरल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष दीपक (बाबा) शिंदे-म्हैसाळकर यांनी मिरजेत केला. 

मिरज : सांगली जिल्ह्यातील कोरोना साथीचा संसर्ग आणि मृत्यूदर पुणे, मुंबईपेक्षा आधिक आहे. ही परिस्थिती हाताळण्यात पालक मंत्री जयंत पाटील पूर्ण अपयशी ठरल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष दीपक (बाबा) शिंदे-म्हैसाळकर यांनी मिरजेत केला. 

ते म्हणाले, ""जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. उपचारांसाठीच्या शासकीय आणि खासगी यंत्रणावरील सरकारचे नियंत्रण सुटले आहे. गरीब रुग्णांना मोफत दूरच पण श्रीमंतानाही भरमसाठ पैसे भरूनही उपचार नाकारले जातात. औषधांचाही काळा बाजार सुरू आहे. अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांनी रुग्णालयाच्या दारातच प्राण सोडले आहेत. खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांची आर्थिक लुबाडणूकही भयानक स्वरूपाची आहे.

एकूणच स्थिती ही भयावह आहे आणि हे सगळे केवळ पालकमंत्र्यांचे जिल्ह्याच्या प्रशासनावर नियंत्रण नसल्यानेच घडते आहे. आतातर स्वतः पालकमंत्रीच डॉक्‍टरांचे ऑडिट करण्यासह औषध विक्रेत्यांना भावनिक आवाहन करत आहेत. त्यांची त्यांची गेल्या दोन वर्षांत दोन दिवसातील वक्तव्य पाहता पालकमंत्री पाटील हे हतबल झाल्याचे स्पष्ट जाणवते आहे. हे सगळे केवळ पालकमंत्र्यांचे व्यवस्थेवरील पालकमंत्र्यांचे नियंत्रण सुटल्यामुळे घडले असल्याचे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांच्या शिवाय या राजकारणात कोणी जबाबदार असू शकत नाही, असाही आरोप या वेळी शिंदे यांनी केला.'' 

मिरजला येणार नाहीत 
मार्कंडेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार नसल्याचे शिंदे यावेळी सांगितले. मंदिराची मालकी ही पटवर्धन सरकारांची आहे.त्यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता आपले बस्तान बसविण्यासाठी काही महाराजांकडून मोदींच्या नावे पैसे जमा करण्यासाठीचा हा फंडा चालवला असल्याचाही आरोप यावेळी शिंदे यांनी केला. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangali Guardian Minister fails to control corona: Mhaisalkar