Sangli: महापालिकेत राष्ट्रवादीला काँग्रेसचे आव्हान? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Municipal corporation

सांगली : महापालिकेत राष्ट्रवादीला काँग्रेसचे आव्हान?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेत सत्तेत येताना आधार घेतलेल्या काँग्रेसलाच अडचणीत आणण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे. त्यामुळे अखेर काँग्रेसचे नेते राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी त्याची जाणीव राष्ट्रवादीला करून दिली आहे. तसेच नगरसेवकांच्या केलेल्या तक्रारीची दखल घेत त्यांनी सदस्यांना नागरिकांच्या प्रश्नासाठी आक्रमक होण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचा हा इशारा आहे.

महापालिकेत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या सहकार्याने भाजपची सत्ता उलथवून टाकत महापौरपद पटकावले. मात्र, गेल्या नऊ महिन्यांत राष्ट्रवादीने एककल्ली कारभार केल्याचे दिसत आहे. काँग्रेसला डावलत त्यांनी काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर काँग्रेसच्या सदस्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्नही केला. काही महिन्यांपूर्वी मंत्री विश्वजित कदम, विशाल पाटील, जयश्री पाटील यांच्या बैठकीतही काँग्रेस सदस्यांनी राष्ट्रवादीच्या कारभाराबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र, याबाबत नेत्यांनीही फारशी दखल तेव्हा घेतली नाही.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

गेल्या तीन महिन्यांत महापालिका क्षेत्रात झालेल्या महापालिकेच्या विविध कार्यक्रमातही काँग्रेसला डावलले गेले. त्यामुळे काँग्रेसने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. काही दिवसांपूर्वी झालेल्या आयर्विनला पर्यायी पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमाकडे काँग्रेसचे नेते राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी पाठ फिरवली. यानंतर महिला बचत गट वस्तू विक्री केंद्राच्या उद्‌घाटन कार्यक्रमासही ते गैरहजर राहिले. हे दोन्ही कार्यक्रम जवळपास राष्ट्रवादीने हायजॅक केले होते. त्यामुळे काँग्रेस सदस्यांमध्ये नाराजी आहे. महापालिकेत सत्ता काँग्रेस-राष्ट्रवादीची असली तरी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. कागदावर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला उघडपणे राष्ट्रवादीचा विरोध करणे अवघड बनले आहे.

सोनेरी टोळीचा शिरकाव

भाजपचे गटनेते विनायक सिंहासने, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी आणि माजी उपमहापौर नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांनी मात्र राष्ट्रवादीवर सातत्याने आरोप करत हल्ला सुरूच ठेवला आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या कारभारात सोनेरी टोळीचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी पुन्हा एकदा महापालिकेत सत्तांतर होताच सोनेरी टोळीने शिरकाव केल्याचा आरोप केला आहे. याकडे राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री जयंत पाटील यांना गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल.

loading image
go to top