पोटभाडेकरुन ठेवून थकवले महापालिकेचे भाडे; सांगलीत खोकीधारकांचा प्रताप

बलराज पवार
Sunday, 4 October 2020

सांगली महापालिकेने भाडेतत्वावर दिलेली खोक्‍यांचे भाडे न भरता उलट पोटभाडेकरुन नेमून त्यांच्याकडून जादा भाडे घेतले जात असल्याचे उघडकीस आले आहे.

सांगली : नेहमीच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या सिव्हील हॉस्पिटल परिसरातील खोकीधारकांचा प्रताप समोर आला आहे. महापालिकेने भाडेतत्वावर दिलेली खोक्‍यांचे भाडे न भरता उलट पोटभाडेकरुन नेमून त्यांच्याकडून जादा भाडे घेतले जात असल्याचे उघडकीस आले आहे. खोकी धारकांनी थकीत भाडे तातडीने भरावे अन्यथा कारवाई करू असा इशारा उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिला. 

महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांनी आज स्वतः सिव्हील हॉस्पिटल परिसरातील खोक्‍यांची मालमत्ता विभागाचे रजिस्टर घेऊन तपासणी केली. यावेळी मूळ खोकेधारकाने जास्त रकमा घेऊन पोटभाडेकरू ठेवल्याचे निदर्शनास आले. शिवाय महापालिकेचे भाडे थकीत ठेवल्याचे दिसून आले. 
सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर असणाऱ्या अनेक खोक्‍यांच्या मालकांनी अनधिकृत पोट भाडेकरू ठेवले आहेत. महापालिकेच्या जागेवर उभारलेल्या खोक्‍यात पोटभाडेकरू ठेवता येत नाही. तरीही याठिकाणी सर्रास पोटभाडेकरू असल्याचे निदर्शस आले आहे. त्यांच्याकडून मूळ खोकीधारकाने मोठ्या प्रमाणात रकमाही घेतल्या आहे. मात्र महापालिकेचे भाडे भरले नाही. त्यामुळे ज्यांनी महापालिकेचे भाडे थकीत ठेवून पोटभाडेकरून पैसे घेतले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिला. 

या कारवाईत अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे, सहायक आयुक्त सहदेव कावडे, वरिष्ठ स्वछता निरीक्षक अविनाश पाटणकर, अतिक्रमण विभागाचे विक्रम घाडगे आणि मालमत्ता विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. 

खोकी जप्त, नंबर रद्द करणार
महापालिकेकडे नोंद असलेली अनेक खोकीही बंद असल्याचे दिसून आले. त्यांचेही भाडे थकीत आहेत. अशा खोक्‍यांमुळे दुर्गंधी, अस्वच्छता निर्माण होते. त्यामुळे अशी खोकी जप्त करुन त्यांचे नंबर रद्द करण्याची कारवाई केली जाईल असा इशारा उपायुक्त रोकडे यांनी दिला आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangali Municipality stall holders do not paid rent