Sangali: प्रवाशांची सोय...पण जीव टांगणीला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवाशांची सोय...पण जीव टांगणीला!

सांगली : प्रवाशांची सोय...पण जीव टांगणीला!

सांगली, मिरज : एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी खासगी प्रवाशी वाहतुकीच्या वाहनांबरोबरच अवजड वाहनांनाही प्रवासी वाहतुकीची मुभा देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. मात्र, या वाहनधारकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट सुरु आहेच शिवाय जीव धोक्यात घालून वाहने हाकली जात आहेत. एखादा अनर्थ घडण्याआधी हा संप मिटावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

अतिशय टुकार वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरुन अनेक वाहनचालक तुफान वेगाने वाहतूक करीत आहेत. राजरोजसपणे शासन मान्यतेने हा गोरखधंदा सुरू आहे. हे कमी काय म्हणून परिवहन विभाग आणि वाहतूक नियंत्रण पोलिसच वडापचालकांच्या सेवेत व्यस्त आहेत. ऐन दिवाळीत आंदोलन सुरू झाले.

हेही वाचा: ENG vs NZ : नंबर वन इंग्लंडला नमवत न्यूझीलंडनं गाठली फायनल

एसटीवर अवलंबून असणारा तळागाळातील प्रवासी वर्गाच्या दिवाळीच्या आनंदावर विरजन पडले आहे. याची संधी खासगी वाहनधारकांनी गाठली. अव्वाच्या सव्वा रक्कम आकारात प्रवाशांची लूट सुरु आहे. मिरज कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरील मुख्य प्रवासी केंद्र आहे. मिरज येथील बस आणि रेल्वे स्थानकावरून नियमितपणे किमान ५० हजार प्रवासी परगावी जातात. गेल्या दोन वर्षांपासून रेल्वेच्या पॅसेंजर गाड्या बंद असल्याने प्रवासी वाहतुकीचा हा सगळा भार एसटीवर पडला.

साहजिकच एसटीचा गल्ला बऱ्यापैकी भरत होता. संप सुरू झाल्याने एसटीचे नुकसान झालेच, प्रवाशांचेही हाल सुरू झाले आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच शेजारील कर्नाटक राज्यासह सोलापूर, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून नियमितपणे हजारो रुग्ण उपचारांसाठी येतात. एसटी आणि रेल्वे दोन्ही बंद असल्याने त्याचा इथल्या वैद्यकीय व्यवसायावर परिणाम झाला आहे.

नियम धाब्यावर..

  • लांब पल्ल्यासाठी टुकार वाहने वापरात

  • क्षमतेपेक्षा भरमसाट प्रवासी वाहतूक

  • जादा कमाईसाठी वेग मर्यादेचे उल्लंघन

  • ट्रॅव्हल कंपन्यांकडून मनमानी भाडेवसुली

  • परवाने नोंदणी नसलेल्या वाहनांमधूनही वाहतूक

  • पर्यायी व्यवस्था तोकडीच...

ऐन हंगामात एस. टी. कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून वडाप, टॅक्सींना परवानगी दिली असली, तरी ती तोकडी असल्याचे पहिल्याच दिवशी स्पष्ट झाले. इस्लामपूर, आष्टा, जत, शिराळा, आटपाडी, तासगाव, विटा, कवठेमहांकाळ, खानापूर यासह कर्नाटकात जाणारी प्रवासी वाहने अत्यल्प होती. कोल्हापूर, पुणे, सातारा, सोलापूर, पंढरपूर यासह विदर्भ, कोकण, मराठवाड्यात जाणाऱ्यांची वाहनांअभावी पुरती गैरसोय होत आहे.

प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी खासगी वाहनधारकांना शासन आदेशाप्रमाणे वाहतुकीची मुभा दिली आहे. मात्र, प्रवाशांचा जीव धोक्यात घालून वाहने चालवली जात असतील तर कारवाई केली जाईल. वाहनांची स्थिती प्रवाशांच्या जीवित धोक्यात आणणारी असेल तर अशी वाहने जप्तच केली जातील. कायदा मोडणाऱ्या प्रवासी वाहतूकदारांनी लक्षात ठेवावे.

- अशोक वीरकर, पोलिस उपअधीक्षक

राज्यभर नेटवर्क असलेल्या एसटी प्रवासादरम्यान सुरक्षिततेसह विश्वासार्हता आहे. रात्री-अपरात्री प्रवास, ज्येष्ठ नागरिकांसह समाजातील विविध घटकांना दिल्या जाणाऱ्या सवलती, भाडे आकारणी हा मुद्दा आहेच. खासगी वाहतूकदार केवळ व्यावसायिक दृष्टी ठेवून, तर एस. टी. कर्मचारी माणुसकीच्या भावनेतून सेवा देतात, हा फरक ओळखून शासनाने यावर तोडगा काढावा. जनतेला सेवेतील फरक कळेल.

- उमेश पाटील, तांत्रिक सहायक, सांगली आगार

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

तक्रारीच्या अनुषंगाने आजपासून सहायक मोटार वाहन निरीक्षकांची नेमणूक स्थानकात केली आहे. एसटीचे अधिकारी, कर्मचारी वाहनांच्या नोंदी ठेवत आहेत. वाहन क्रमांक, चालकाचे नाव, मोबाईल क्रमांक, प्रवासी संख्या, निघाल्याची वेळ अशी संपूर्ण नोंद ठेवण्यात येत आहे. प्रत्येक वाहनांचे रेकॉर्ड ठेवण्यात येत आहे. जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारणी मुभा असून त्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा.

-विलास कांबळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली

loading image
go to top