Sangli: दुष्काळी तालुक्यांत ‘समन्यायी’ पाणी वाटप - डॉ. पाटणकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water

सांगली : दुष्काळी तालुक्यांत ‘समन्यायी’ पाणी वाटप - डॉ. पाटणकर

सांगली : आटपाडी तालुक्यात पूर्णत्वास आलेला पाण्याच्या समन्यायी वाटपाचा पॅटर्न राज्यातील सर्वच दुष्काळी तालुक्यांमध्ये राबवण्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत सहमती दर्शवण्यात आली. येत्या जानेवारीत आटपाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमात याबाबतचा धोरणात्मक आराखडा जाहीर करण्यात येणार आहे. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, आनंदराव पाटील यांनी आज ही माहिती दिली.

मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये श्री. पवार यांच्यासमवेत ‘आटपाडी पॅटर्न’बाबत कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. आटपाडीमध्ये आजवर झालेल्या सुमारे ८० टक्के पाणी वाटपाची माहिती त्यांनी घेतली. उर्वरित ११ गावांनाही पाणी देण्यासाठीच्या कामाची सुरुवात येत्या जानेवारीत होणार आहे. तेव्हाच हा धोरणात्मक निर्णय जाहीर होईल. त्यासाठी आवश्‍यक प्रस्ताव आठवडाभरात तयार करावा, अशी सूचना श्री. पवार यांनी केली आहे. त्यानुसार श्रमिकतर्फे कार्यवाही केली जाणार असल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

ते म्हणाले, ‘‘ सिंचन योजनांच्या पूर्ततेसाठी जसा आमचा लढा सुरू राहिला, तसाच भूमीहिनांच्या हक्कासाठीही तितकाच आग्रही आमचा लढा राहिला. शेकडो बैठका आणि आंदोलनानंतर सरकारने २००५ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर सांगोला, आटपाडी आणि तासगाव तालुक्यासाठी या पथदर्शी प्रकल्पास संमती दिली. आज आटपाडी तालुक्यातील ४९ गावांमध्ये यशस्वी वाटप झाले. याच तालुक्यातील उर्वरित ११ गावांसाठी असेच पाणी देण्यासाठीच्या कामांना प्रारंभ होत आहे. तासगाव आणि सांगोला तालुक्यासाठी फेरआखणीचे काम झाले आहे.’’

समन्यायी वाटप?

भूमिहिनांसह शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वच कुटुंबांना बंद पाईपने हक्काचे पाणी देणारे धोरण म्हणजे समन्यायी पाणी वाटप. व्यक्तीला एक हजार घनमीटर आणि कुटुंबाला पाच हजार घनमीटर पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे पाणी पावसाचे, तलावाचे आणि सिंचन योजनांचे अशा तीनही स्त्रोतापासूनचे असेल. ते बंदिस्त पाईपमधून द्यायचा आग्रह पुढे आला. एवढ्या पाण्याची हमी दिल्यास त्या कुटुंबाचे रोजगारासाठी शहरात स्थलांतर होणार नाही.

loading image
go to top