केन ॲग्रोच्या कर्जावरून संचालकांत उभी फूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

Sangli : केन ॲग्रोच्या कर्जावरून संचालकांत उभी फूट

सांगली : जिल्हा बॅंकेतील मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील यांचे गुरुवारचे राजीनामानाट्य देशमुखांच्या केन ॲग्रो कारखान्याच्या कर्जाच्या पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून संचालक मंडळात झालेल्या मतभेदातून घडल्याची चर्चा आहे. याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांची भूमिका मात्र सर्वांनाच संभ्रमात टाकणारी आहे. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजत असताना संचालक मंडळातील मतभेद नव्या समीकरणाची मांडणी ठरू शकते.

गेल्या साडेसहा वर्षांच्या कालखंडात बँकेने विक्रमी नफा मिळवण्याची कामगिरी केली. बँकेच्या कारभाराचा गवगवा सुरू असताना सारे कसे शांत शांत होते; मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर बँकेतील मतभेदाला तोंड फुटले आहे. त्याची सुरुवात संचालक आमदार मानसिंगराव नाईक यांनी वैयक्तिक तसेच काही संचालकांच्या तक्रारीतून झाली. खरे तर आमदार नाईक यांनी केलेली तक्रार जयंत पाटील यांना ज्ञात नसेल यावर कोणीही विश्‍वास ठे‍वणार नाही. त्याचवेळी या तक्रारीनुसार सुरू झालेल्या चौकशीला अचानक स्थगिती मिळाली तीही जयंतरावांच्या इच्छेशिवाय यावरही कोणी विश्‍वास ठेवणार नाही. यातून अध्यक्ष दिलीप पाटील आणि पालकमंत्री जयंत पाटील यांच्यात नेमके काय धुसफुसत असेल याचाही काहीसा अंदाज येऊ शकेल.

कालचे राजीनामानाट्य घडण्याआधी गेल्या महिन्यात इस्लामपूर येथे बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या उद्‌घाटनावेळी सर्व संचालकांच्या वादळी गुप्त बैठकीची पार्श्वभूमी आहे. या बैठकीच्या अजेंड्यावर बँकेच्या अन्य संचालकांच्या कर्ज प्रकरणाबरोबरच केन ॲग्रोच्या सुमारे दोनशे कोटींच्या कर्जाच्या पुनर्रचनेचा कळीचा मुद्दा होता. खासदार संजय पाटील आणि बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख भाजपचे असले तरी त्यांच्यातील राजकीय संघर्ष आता टोकाला गेला आहे. इस्लामपूरच्या बैठकीत जयंतरावांनी केन ॲग्रोच्या कर्जाच्या पुनर्रचनेला संमती दिल्याची चर्चा होती. मुळात आधी स्वाक्षरी आणि नंतर विषय इतिवृत्तावर घ्यायचा बँकेत शिरस्ता असल्याने कालच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विषय संचालकांच्या सत्काराचा होता असे सांगितले जात असले तरी संचालकांच्या स्वाक्षऱ्या घ्यायचा इरादा होता.

हेही वाचा: कोल्हापूर - रविवारी कॅन्डल मार्च तर सोमवारी जिल्हा बंद

मात्र खासदार गटाने सवता सुभा मांडत गैरहजेरी लावली. दरम्यान, कालच्या बैठकीत कडू-पाटील यांचा राजीनाम्याचा विषय अध्यक्ष दिलीप पाटील यांच्याकडून आल्यानंतर खासदार पाटील यांनी बँकेत धाव घेत कडू-पाटील यांना मध्येच विश्रामगृहावर बोलावून नेले. केन अॅग्रोच्या वसुलीची प्रक्रिया सुरू करा, अशी स्पष्ट भूमिका खासदार पाटील यांनी कडू-पाटील यांच्याकडे मांडली. त्यानंतरच त्यांनी बँकेतील राजीनामा द्यावा, असेही सुचवले.

या सर्व रेट्यात कडू-पाटील यांना आता बाहेर पडायचे आहे; मात्र त्यासाठी सुरक्षित अशी वाट त्यांना कशी मिळणार हे येत्या काळात दिसेल. त्यांनी राजीनामा द्यावा ही त्यांचीच की अन्य कोणाची इच्छा, हे मात्र गूढ आहे. ते पुण्याला रवाना होताना त्यांनी सोमवारी परत बँकेत येणार असल्याचे सांगितले असले तरी ते परत येतीलच यावर आता बँकेच्या वर्तुळातील कोणालाही खात्री उरलेली नाही. एक निश्‍चित की येत्या काळात बँकेच्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी कडू-पाटील यांच्या राजीनाम्याचा मुद्दा असेल.

संशयास्पद गोष्टी बाहेर येतील?

जिल्हा बॅंकेतील राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम ठेवत जयंत पाटील यांनी बिनविरोधचा फॉर्म्युला पुढे आणला आहे; तथापि भाजपचे खासदार संजय पाटील आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यातील संघर्ष अडचणीचा मुद्दा असेल. काँग्रेसनेही सन्मानाच्या भागीदारीचा मुद्दा पुढे आणला आहे. त्यामुळे जसजशा निवडणुका येतील तसे संघर्षाचे अनेक पदर पुढे येणार आहेत. यानिमित्ताने तरी बँकेतील गेल्या साडेसहा वर्षांतील संशयास्पद गोष्टी बाहेर येतील, अशी सर्वसामान्य सभासदांना आशा आहे.

टॅग्स :CongressSangliBjpNCP