esakal | सांगली बंद उठवण्याबाबत खलबते;रात्री उशीरा निर्णय अपेक्षित
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil

सांगली बंद उठवण्याबाबत खलबते, रात्री उशीरा निर्णय अपेक्षित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली: गेल्या तीन महिन्यांपासून अपवाद वगळता सांगलीत (sangli) व्यापारी पेठा बंद आहेत. या काळात रुग्णसंख्या घटली का? मग आणखी एक आठवडाभर बंद ठेवून ती कमी येईल, अशी खात्री कोण देणार? लोकांची परीक्षा पाहण्याची वेळ आता संपली आहे, काहीतरी मधला मार्ग काढला पाहिजे, व्यापारी पेठांना उघडण्यास मान्यता दिली पाहिजे, अशी चर्चा आज पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्‍वजीत कदम आणि जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी (Jayant Patil,Vishwajeet Kadam, Abhijit Choudhari)यांच्यातील ऑनलाईन आढावा बैठकीत झाली. (sangli-all-shops-open-tender-aggressive-jayant-patil-vishwajeet-kadam-abhijit-choudhari-lockdown-news-akb84)

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी या विषयावर चर्चा करून मध्यममार्ग काढण्याबाबत आणि त्यासाठीचा आराखडा तयार करण्याबाबत निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.सांगली बाजारपेठ बंदबाबत आता नाराजी टोकाला पोहचली आहे. गेल्या आठवड्यात प्रशासनाने पुन्हा सात दिवसांचा बंद जाहीर केला. त्याचा निषेध करत लोक रस्त्यावर उतरले. व्यापाऱ्यांनी मानवी साखळी करत ‘भीक द्या’,अशी साद घातली. त्याआधी सामान्य व्यापारी रस्त्यावर एका जागी थांबून राज्य शासनाला साकडे घालताना दिसले. या आठवड्यात व्यापारपेठांना अटींसह मान्यता नाही दिली तर वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.

शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात व्यापारी पेठा खुल्या झाल्या, साताऱ्यात मोकळीक दिली, मग सांगलीबाबत असे धोरण का, असा जाहीर सवालही केला जातोय.त्या पार्श्‍वभूमीवर आज पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा घेतला. या ऑनलाईन बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आकडे अजूनही चिंताजनक असल्याचे सांगितले. राज्याचे आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी आणखी काही काळ निर्बंध कडक ठेवण्याबाबत सूचना दिल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.

राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांनी मात्र सतत बंद ठेवूनही रुग्णांचे आकडे कमी होत नसतील तर बंदचा उपयोग काय होतोय? दुसरी लाट सुरु झाली तेंव्हा नऊशेहून अधिक रुग्ण होते आणि आता एक हजाराच्या घरात आहेत, मग बंदने काय साध्य झाले, असा सवाल उपस्थित झाला. त्यामुळे बंद रद्द करून अटी व नियम कडक करून व्यापारी पेठा खुल्या करण्यास मान्यता द्यावी, असा आग्रह या बैठकीत झाल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: 'राजकीय नेत्यांनी कोरोनाचे भान ठेवले पाहिजे'

या अटी आणि नियम कसे असावेत, कधी व किती वेळासाठी दुकाने सुरु ठेवता येतील, याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रात्री उशीरापर्यंत सांगलीच्या बाजारपेठा सोमवारी उघडणार की कुलुपबंदच राहणार, याचा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली पेठेतील व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांची मते पुन्हा जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी काही काळात योग्य तो निर्णय दिला जाईल, असे सांगितले. त्याची आता प्रतिक्षा आहे.

‘‘सांगलीतील व्यापारी पेठा खुल्या करण्याबाबतच्या धोरणावर चर्चा सुरु आहेत. रात्री उशीरापर्यंत काहीएक निर्णय निश्‍चित केला जाईल.’’

डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी सांगली

loading image