Sangli : भाजप पदाधिकाऱ्यांत ‘फ्री स्टाईल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘फ्री स्टाईल’ हाणामारी झाली.

Sangli : भाजप पदाधिकाऱ्यांत ‘फ्री स्टाईल’

सांगली : भाजपचे, माजी उपमहापौर व स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी व भाजपच्याच युवा मोर्चाचे सरचिटणीस अतुल माने यांच्यात आज महापालिकेच्या आवारात ‘फ्री स्टाईल’ हाणामारी झाली. त्यानंतर दोघांच्याही समर्थकांनी महापालिका परिसराला वेढले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

समोरच असलेल्या शहर पोलिस ठाण्यातून तातडीने कुमक दाखल झाल्याने वातावरण निवळले. चैत्रबन नाल्याच्या निविदेवरून हा वाद झाल्याची चर्चा आहे. रात्री उशिरापर्यंत या वादावर पडदा टाकण्यासाठी भाजप नेतेमंडळी किल्ला लढवत होती. त्यामुळे पोलिसांत फिर्याद दाखल करण्याबाबत उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती.

प्रत्यक्षदर्शी सूत्रांनी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आज स्थायी समितीची सभा होती. सभेसाठी श्री. सूर्यवंशी व अन्य सदस्य पालिकेत आले होते. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. दरम्यानच्या काळात श्री. माने महापालिकेच्या मंगलधाम कार्यालयात आले होते. ते महापालिकेतील विविध विकासकामांबाबत आले होते.

श्री. माने ज्या प्रभागात काम करतात, त्यात म्हणजे पोलिस मुख्यालयाच्या दक्षिण बाजूला वाहणाऱ्या चैत्रबन नाल्याच्या बांधबंदिस्तीसाठी दहा कोटींच्या विकास कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘जिल्हा नियोजन’मधून हे काम करण्यावरून, तसेच हा निधी पालिकेऐवजी ‘जिल्हा नियोजन’कडे वर्ग करण्यावरूनही यापूर्वी वाद रंगला होता. आज श्री. माने या कामासाठी महापालिकेत आल्याची माहिती श्री. सूर्यवंशी यांना मिळाली. त्यानंतर दोघांत फोनवरून बाचाबाची झाली. त्यानंतर माने यांनी महापालिकेचे मुख्यालय गाठले. सभा सुरू असतानाच मध्येच श्री. सूर्यवंशी बाहेर आले. दोघे समोरासमोर आल्यानंतर थेट जुंपली.

काही नगरसेवक वाद सोडवण्यासाठी धावले. पोलिसांनी तत्काळ माने यांना बाजूला घेत शहर पोलिस ठाणे गाठले. त्यामुळे वातावरण तंग झाले. ही वार्ता समजताच परिसर कार्यकर्त्यांनी वेढला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दोघांचीही फोनवरून समजून काढली. तथापि, रात्री उशिरापर्यंत वाद धुमसत होता. पोलिस ठाण्याच्या आवारात कार्यकर्ते दबा धरून बसले होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद झाली नव्हती.

चैत्रबन नाल्याचे काम माझ्या प्रभागातील असल्याने पाठपुराव्यासाठी आलो होतो. सभापतींचा हस्तक्षेप नको, हे सांगत होतो. वादावर पडदा टाकण्यास पक्षनेत्यांनी सांगितले.

- अतुल माने, सरचिटणीस, भाजप युवा मोर्चा

किरकोळ मतभेद झाले आहेत. आमचा पक्षांतर्गत वाद होता. आम्ही हा विषय संपवला आहे.

- धीरज सूर्यवंशी, सभापती, स्थायी समिती