esakal | चैत्राली राजे करणार ‘ऑनलाईन लावणी’
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

Sangli : चैत्राली राजे करणार ‘ऑनलाईन लावणी’

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : हिंदी-मराठी सिनेमा जगतात ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ तुफान लोकप्रिय होत असतानाच आता लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे यांनी ऑनलाईन लावणी शो करण्याचा निर्णय घेतला आहे. काळाच्या पडद्याआड निघालेल्या जुन्या लावण्यांसह रसिकांच्या मनात घर केलेल्या प्रख्यात लावण्या त्या तळहातावरील जगात घेऊन येणार आहेत. त्यासाठीही तिकीट बारी लागेल, मात्र ती थोडी वेगळ्या पद्धतीची असेल. येत्या काही दिवसांत पहिला शो करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती चैत्राली राजे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

कोरोना संकट काळाने जगाचे रुपडे बदलून गेले आहे. मनोरंजन विश्‍वाने वेगळा मार्ग धरला आहे. बॉलीवूडचे अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर आले आणि तुफान चाललेदेखील. हा बदल लावणी विश्‍वात का नको, असा सवाल राजे यांनी व्यक्त केला. त्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या टीमने अभ्यास केला आणि अखेर लावणीला थेट ऑनलाईन नेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सध्या काळाच्या ओघात जुन्या लावण्या विस्मृतीत जात आहेत. काही प्रख्यात लावण्या टिकून असल्या तरी डीजे, रिमिक्सच्या काळात लावणीपेक्षा सिनेगीतांवरील नृत्याचाच शो होताना दिसतो आहे. मूळ लावणी राहिलीच नाही, अशी खंत त्या व्यक्त करतात.

चैत्राली म्हणाल्या, ‘‘लावणी शोचे विकृत स्वरुपही मला या माध्यमातून बदलता येईल. बैठकीची लावणी असेल किंवा पारंपरिक अन्य लावण्या असतील त्या मूळ स्वरूपात रसिकांसमोर मी नेईन. देशातील लावणी रसिक या शोसाठी हजेरी लावू शकेल. त्यासाठी लागणारी सर्व तांत्रिक बाजू आता तयार होत आहे.’’

यू-ट्यूबवर प्रतिसाद

चैत्राली राजे यांनी कोरोना लॉकडाऊन काळात काही लावण्या यू-ट्यूबसाठी केल्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात त्यांनी बहुतांश जुन्या काळातील विस्मृतीत निघालेल्या लावण्या रसिकांपुढे आणल्या. त्यातूनच ऑनलाईन शोची कल्पना सुचल्याचे त्यांनी सांगितले.

लावणीच्या थिएटरमधील शोला प्रतिसाद अत्यंत कमी होत आहे. हा प्रयोग आता अडचणीचा ठरतोय. नवा काळ आहे, त्याच्याबरोबर चालले पाहिजे. ऑनलाईन लावणीच्या निमित्ताने जुन्या लावण्या महाराष्ट्र आणि देशभर नेण्याची संधी मी साधण्याचा प्रयत्न करेन. रसिक त्याला भरभरून दाद देतील, असा विश्‍वास वाटतो.

- चैत्राली राजे, लावणी सम्राज्ञी

loading image
go to top