
सांगली : राष्ट्रीय महामार्गापासून सांगली शहर वंचित
सांगली: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या धडाक्यामुळे देशभरात सांगली जिल्ह्यातूनही तीन राष्ट्रीय महामार्ग जात आहेत; तर सांगली-मिरज शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची तसेच सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे-बंगळूर महामार्गाची घोषणाही कागदावरच आहे. आज सांगलीत मंत्री गडकरी काय बोलणार याकडे जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातून औद्योगिक आणि कृषी विकासाला चालना देण्यासाठी दळणवळण वाढणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जिल्हा राष्ट्रीय महामार्गावर येणे तसेच औद्योगिक क्षेत्रांची उभारणी गरजेचे आहे. मोदी सरकारच्या दोन टर्ममध्ये जिल्ह्यात चार महामार्गांची कामे सुरू झाली. नागपूर-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेले अनेक वर्षे सुरू आहे. यातील जिल्ह्यातून जाणारा बराचसा टप्पा पूर्ण झाला आहे. त्याचे श्रेय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनाच द्यावे लागेल. त्यांच्या केंद्रीय मंत्री पदाच्या पहिल्या टप्प्यात गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गाची घोषणा झाली होती. कऱ्हाड-कडेगाव- विटा- खानापूर- जत आणि पुढे विजापूर असा हा मार्ग आहे. पाठोपाठ खासदार संजय पाटील यांच्या प्रयत्नामुळे कऱ्हाडमधूनच पुढे पलूस-पाचवा मैल- तासगाव- कवठेमहांकाळ- जत असाही एक राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात आला.
कोणाची वक्रदृष्टी?
गेली अनेक वर्षे या रस्त्याबद्दल सांगलीकरांची ओरड सुरू आहे. अपघात होत आहेत. आणखी किती वर्षे वाट पहायची? या रस्त्यावर कोणाची तरी वक्रदृष्टी पडल्यामुळे अजूनही हा महामार्ग बासनात गुंडाळला आहे. आज गडकरी यांनीच यावर बोलावेच अशी अपेक्षा आहे.
‘पुणे- बंगळूर’ कागदावरच
स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गतवर्षी पुण्यात पुणे- बंगळूर एक्स्प्रेसची घोषणा केली होती. हा महामार्ग फलटण-मायणीवरून, विटा, तासगाव, काकडवाडी, सावळी, म्हैशाळमधून पुढे बेळगाव आणि बंगळूरकडे जाणार आहे. मात्र हा महामार्गही कागदावरच आहे. हा मार्ग फलटण, विटा, तासगाव मार्गे कर्नाटकात जावा अशी अपेक्षा आहे. त्याचे आदेशही नितीन गडकरी देतील अशी आशा आहे.
पेठ-सांगली-मिरज बारगळला?
या राष्ट्रीय महामार्गांबरोबरच पेठ-सांगली-मिरज या राष्ट्रीय महामार्गाचीही घोषणा झाली होती. त्यामुळे गेली कित्येक वर्ष दुरवस्थेत असलेला सांगली-इस्लामपूर रस्ता चांगला होईल या आशेवर सांगलीकर होते. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आल्याचे आणि या महामार्गासाठी साडेचारशे कोटींचा निधी मिळणार असल्याचे जाहीर झाले. त्याचा आराखडा तयार आहे आणि तो केंद्राकडे गेल्याची चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात हा मार्ग अजूनही राज्य सरकारच्या ताब्यात असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केवळ डागडुजी, दुरुस्तीसाठी वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षीच या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १२ कोटींचा निधी मिळाला आहे. मात्र महामार्ग म्हणून काम सुरू झालेले नाही.
विकासासाठी ‘कनेक्टिव्हिटी’ महत्त्वाची
औद्योगिक विकासासाठी सांगलीची महामार्गांशी कनेक्टिव्हिटी असणे महत्त्वाचे आहे. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण सुरू आहे. शिवाय जवळच्या कोल्हापूरमध्ये विमानतळही आहे. मात्र सांगलीला महामार्गाची कनेक्टिव्हिटी नाही. सांगली ते कोल्हापूर या रस्त्याचेही भिजत घोंगडे पडले आहे. सांगलीशी महामार्ग जोडणे गरजेचे असून आज याबाबत गडकरी यांच्याकडून स्पष्ट भाष्य व्हावे अशी अपेक्षा आहे.
जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग
मार्ग क्र. १६६ : कोल्हापूर, अंकली, मिरज, कवठेमहांकाळ, नागज, पंढरपूर
मार्ग क्र. १६६ ई : कऱ्हाड, कडेगाव, विटा, खानापूर, भिवघाट, नागज, जत, विजापूर
मार्ग क्र. २६६ : कऱ्हाड, पलूस, तासगाव, कवठेमहांकाळ, डफळापूर, जत
मार्ग क्र. १६६ एच : पेठ, इस्लामपूर, आष्टा, सांगली, मिरज (केवळ घोषणा)
मार्ग क्र. १६० : मायणी, विटा, तासगाव, काकडवाडी, सावळी, विजयनगर, म्हैसाळ, कागवाड (केवळ घोषणा)
Web Title: Sangli City Deprived National Highway
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..