
सिटी सर्व्हे उतारा देण्यासाठी 75 हजारांची लाच घेताना नगर भूमापन अधिकारी सुरेश शिवमूर्ती रेड्डी (वय 48, रा. गव्हर्न्मेंट कॉलनी, विश्रामबाग, सांगली) यास रंगेहाथ पकडले.
सांगली ः सिटी सर्व्हे उतारा देण्यासाठी 75 हजारांची लाच घेताना नगर भूमापन अधिकारी सुरेश शिवमूर्ती रेड्डी (वय 48, रा. गव्हर्न्मेंट कॉलनी, विश्रामबाग, सांगली) यास रंगेहाथ पकडले. सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. विजयनगर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ही कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी, की तक्रारदाराच्या वडिलांनी तक्रारदार व त्यांच्या भावाच्या नावाने बक्षीसपत्राने मालमत्ता लिहून दिली होती. या बक्षीस पत्राची सिटी सर्व्हे उताऱ्यावर नोंद घेऊन, त्याचा उत्तारा देण्यासाठी सुरेश रेड्डी याने एक लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवले. त्यानुसार विभागाने तक्रारीची पडताळणी केली.
रेड्डी याने 75 हजार रुपये घेऊन येण्यास सांगितले होते. त्यानुसार आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विजयनगर येथील प्रशासकीय इमारतीत सापळा रचला. सायंकाळी सातच्या सुमारास रेड्डीस लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
लाचलुचपतचे अधीक्षक राजेश बनसोडे, अपर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक प्रशांत चौगुले, अविनाश सागर, सलीम मकानदार, सुहेल मुल्ला, रवींद्र धुमाळ, संजय संकपाळ, संजय कलकुटगी, भास्कर भोरे, धनंजय खाडे, प्रतिम चौगुले, राधिका माने, चालक बाळासाहेब पवार यांचा कारवाईत सहभाग होता.
वर्ग- 2चा अधिकारी जाळ्यात
सुरेश रेड्डी हा नगरभूमापन विभागातील "वर्ग-2'चा अधिकारी आहे. तो लाचलुचपतच्या जाळ्यात सापडल्याने विभागात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची या वर्षातील पहिलीच मोठी कारवाई आहे.
टोल फ्री क्रमांक
शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. 1064 हा टोल फ्री क्रमांक आहे. तसेच संकेतस्थळावरूनही तक्रार करता येते, असे उपाधीक्षक सुजय घाटगे यांनी सांगितले.
संपादन : युवराज यादव