
सांगली : काँग्रेस, भाजप नगरसेवकांचा महापौरांना घेराओ
सांगली: मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्याच्या विषयावरून महापालिकेच्या महासभेत सोमवारी जोरदार गदारोळ झाला. काँग्रेस व भाजपचे नगरसवेक महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या पीठासनासमोरील जागेत धावून गेले. त्यांना राष्ट्रवादी व काँग्रेसमधील काही नगरसेवकांनी विरोध केला. पीठासनावरून राजदंड हिसकावून घेण्यात आला. या गोंधळातच सर्व विषय मंजूर झाल्याचे सांगत महापौरांनी सभागृहातून काढता पाय घेतला.
महापौर सभा गुंडाळून गेल्यानंतर भाजप व काँग्रेसच्या नगरसेवकांनी ‘पळाले रे, पळाले महापौर पळाले, पळपुट्या महापौरांचा निषेध असो, अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. त्यानंतर ५३ सदस्यांनी समांतर सभा घेत महापौरांचा निषेध केला. ही सभा बेकायदेशीर असल्याने रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तर महापौरांनी सभा कायदेशीर असल्याचा दावा केला.
महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महासभा होती. मागील सभेला न्यायालयात आव्हान दिल्याने त्या सभेचे इतिवृत्त कायम करण्यास नगरसेवकांचा विरोध होता. याच विषयावर सभेत गोंधळ सुरू झाला. भाजपच्या नगरसेविका सविता मदने यांनी या विषयावरून औचित्याचा मुद्दा (पॉईंट ऑफ ऑर्डर) उपस्थित करत पान ११ वर काँग्रेस, भाजप नगरसेवकांचा महापौरांना घेराओ मतदान घेण्याची मागणी केली.
त्याला काँग्रेसचे संतोष पाटील यांनी पाठिंबा देत चर्चेची मागणी केली. महापौर सूर्यवंशी यांनी हा विषय विषयपत्रिकेवर आहे. त्यांचे वाचून झाल्यानंतर चर्चा करू, असे सांगितले. मात्र, याला मदने, पाटील यांच्यासह भाजप-कॉंग्रेस नगरसेवकांनी विरोध केला. औचित्याच्या मुद्द्यावर चर्चा करत हा विषय रद्द करून पुढील सभेला मागील सभेचे सर्व विषय पुन्हा घ्यावेत किंवा अन्यथा हा विषय मंजूर करायचा असेल तर मतदान घ्यावे, अशी मागणी केली. मात्र, महापौरांनी ती मान्य केली नाही. आधी विषय वाचून मग त्यावर चर्चा करण्याची महापौरांनी तयारी दर्शवली. यामुळे सभागृहात गोंधळ सुरू झाला.
मोठा गदारोळ सुरू असतानाच हा विषय मंजूर करण्याची मागणी काँग्रेसचे सदस्य मंगेश चव्हाण, मयूर पाटील, फिरोज पठाण यांनी केली. याला काँग्रेसमधील अन्य नगरसेवक व भाजप नगरसवेकांनी विरोध केला. दोन्ही बाजूचे नगरसेवक महापौरांसमोरील पीठासनासमोर आले. पीठासनावर चढून जोरदार घोषणाबाजी केली. सदस्य महापौरांच्या अंगावर धावून गेले. यावेळी महापौरांच्या बचावासाठी काही सदस्य धावल्याने आणखी गदारोळ वाढला.
अखेर राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी महापौरांना सर्व विषय मंजूर करण्याची सूचना केली. महापौर सूर्यवंशी यांनी सर्व विषय मंजूर झाल्याचे सांगत सभा संपल्याचे जाहीर केले. यानंतर काँग्रेस व भाजपच्या नगरसेवकांनी आणखीन जास्त गोंधळ घालायला सुरुवात केली. धीरज सूर्यवंशी अन्य सदस्यांनी महापौरांना सभागृहाबाहेर जाण्यापासून रोखले. भाजपच्या महिला नगरसेविकांना महापौरांना घेराव घातला. त्याचवेळी राजदंडही हिसकावून घेण्यात आला. भाजप नगरसेवकांच्या तावडीतून महापौरांना शिताफीने सोडवत सभागृहाच्या दुसऱ्या प्रवेशद्वारातून सभागृहाबाहेर काढता पाय घेतला. यानंतर भाजप व काँग्रेसच्या सदस्यांनी पळाले रे पळाले महापौर पळाले, पळपुट्या महापौरांचा निषेध असो, अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. यानंतर भाजपचे शेखर इनामदार व काँग्रेसच्या संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली समांतर सभा घेण्यात आली.
भाजपची भूमिका...
सभागृह नेते विनायक सिंहासने म्हणाले, महापौरांनी चुकीच्या पद्धतीने सभा गुंडाळली आहे. या सभेचे कामकाज झालेलेच नाही, सभा बेकायदेशीर असून याविरोधात आयुक्त, नगरसचिव व शासनाकडे तक्रार करणार आहे. शेखर इनामदार म्हणाले, इतिवृत्त कायम करण्यास आमचा विरोध नव्हता. मात्र, यातील काही विषयावर सभागृहात चर्चा होणे अपेक्षित होते भू संपादानासाठी १६ कोटी रुपये अदा करण्यात येणार आहे. ही जागा कोणती? तिथे महापुराचे पाणी येते त्यांचे काय करणार ? यावर चर्चा करण्याची गरज होती. या विषयाला आमचा विरोध नव्हता. तसेच नागरिकांचा विरोध डावलून रहिवासी विभागात सात मजली कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय झाला आहे. याला नागरिकांचा व त्या भागातील नगरसेवकांचा विरोध आहे. कोणालाही माहिती न देता हा विषय मागील सभेत घुसडण्यात आला आहे. म्हणून आमचा विरोध होता.
काँग्रेसची भूमिका...
विरोधी पक्षनेते संजय मेंढे म्हणाले, ‘औचित्याचा विषय दाखल करण्यात आल्यामुळे तो घेणे महत्त्वाचे होते. त्यांनी तो केला नाही. आमच्या पार्टी मिटिंगमध्ये याविषयी सविस्तर चर्चा होण्याची मागणी झाली होती. त्यामुळे महापौरांनी मनमानी कारभार करत सभा गुंडाळली आहे. याचा आम्ही निषेध करतो.’ संतोष पाटील म्हणाले, ‘मागील सभा ऑनलाईन बोलवली होती. काँग्रेससह सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी विरोध केला होता. शंभरपेक्षा जास्त विषय त्या सभेत होते. यावर ऑफलाईन सभेत चर्चा करण्याची मागणी आम्ही केली होती. महापौरांनी पार्टी मिटिंगमध्ये ती मान्य करून ऑनलाईन सभा तहकूब करून नंतर ऑफलाईन सभेत या विषयावर चर्चा करण्याचा शब्द दिला होता. मात्र, तसे न करता त्यांनी ऑनलाईन सभेतच हे सर्व विषय मंजूर केले. या सभेवर काँग्रेस, भाजपने बहिष्कार टाकला होता. त्यामुळे सभेला कोरम नव्हता तरीही महापौरांनी हट्टाने व बेकायदेशीरपणे सभा घेतली. म्हणून त्या सभेचे इतिवृत्त कायम करण्यास आमचा विरोध आहे. आजच्या सभेत हा विषय वगळून अन्य विषयांवर चर्चा करण्याची आमची तयारी होती. मात्र, महापौरांनी सभा गुंडाळली.’
महापौरांची भूमिका...
महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, ‘सभा सुरू करण्यापूर्वी वायरमनच्या मृत्यूबाबत आलेल्या औचित्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी साऱ्यांना वेळ दिला होता. दीड-दोन तास यावर चर्चा झाली आणि त्यानंतर मत नोंदवण्यात आले. नगरसेविका सविता मदने यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, हा मुद्दा अती महत्त्वाचे प्रश्न विषय पत्रिकेत नसताना उपस्थित केला जातो. त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा हा विषय पत्रात होताच, आम्ही सविस्तर चर्चाही करायला तयार होतो. मात्र, भाजप आणि काही काँग्रेसच्या नगरसेवकांनी गदारोळ केला. त्यांना आसनस्थ होण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी गदारोळ सुरूच ठेवला. यामुळे सभेतील सर्व विषय मंजूर करत सभा संपवण्यात आली. आजची सभा पूर्णतः कायदेशीर झाली आहे. सभेतील सर्व विषय मंजूर झाले आहेत.’
थोरातांचे आंदोलन...
सभा सुरू झाल्यानंतर सदस्य योगेंद्र थोरात यांनी पीठासनावर ठिय्या मारत आंदोलन सुरू केले. बांधकाम विभाग बरखास्त करा, असे फलक घेऊन ते बसले होते. त्यानंतर त्यांना बोलण्यास संधी दिली. ते म्हणाले, ‘शासनाकडून मंजूर असलेल्या निधीतील विकासाची कामे बांधकाम विभागाकडे दिली जातात. महापालिका क्षेत्रातील कामे महापालिकेनेच केली पाहिजेत; अन्यथा पालिकेतील बांधकाम विभाग बरखास्त करा. जिल्हा परिषदेप्रमाणे याठिकाणीही तसा ठराव करा.’ यानंतर महापौरांनी सारी माहिती घेऊन ठराव केला जाईल, असे सांगितले.
Web Title: Sangli Congress Bjp Corporators Surround
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..