सांगली : लोकार्पणावेळी होणार शक्तिप्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 महापौर दिग्विजय सूर्यवंशी

सांगली : लोकार्पणावेळी होणार शक्तिप्रदर्शन

सांगली: येथील विजयनगर येथे २ एप्रिल रोजी पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. या सोहळ्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी महाविकास आघाडीने केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज महापालिकेच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी हा निर्धार करण्यात आला. तसेच शहरातील नागरिक मोठ्याप्रमाणावर आणण्यासाठी प्रभागनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर दिग्विजय सूर्यवंशी होते. तसेच विरोधी पक्षनेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरसेवक विष्णू माने यांनी कार्यक्रमस्थळाच्या नियोजनाची माहिती दिली.

ते म्हणाले,‘‘कार्यक्रमस्थळी भव्य मंडप उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परिसरातील खुल्या भूखंडांसह दीडशे फुटी रस्ता परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे.’’

नगरसेवक मनोज सरगर यांनी विविध सूचना मांडल्या. त्यात प्रभाग निहाय बैठका घेण्याची सूचना मांडण्यात आली. त्यानुसार तातडीने महापौरांनी आजपासूनच बैठकांचे आयोजन करण्यात येईल, असे सांगितले. नगरसेवक विजय घाडगे, संतोष पाटील, प्रशांत पाटील, शिवाजी दुर्वे, शेठजी मोहिते, फिरोज पठाण, मयूर पाटील, मनगू सरगर, नगरसेविका स्वाती पारधी, मालन हुलवान, शुभांगी साळुंखे, वर्षा निंबाळकर, वहिदा नायकवडी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शंभोराज काटकर, कुपवाड शहर प्रमुख अमोल पाटील यांनी सूचना मांडल्या. तसेच शहरात रिक्षाद्वारे माहिती सर्वत्र पोहोचवावी, असे साऱ्यांनी सुचवले.

शिवसेनेचे विभूते म्हणाले,‘‘अहल्यादेवी या राजमाता आहेत. त्यामुळे हा सोहळा सर्वसमावेशक झाला पाहिजे यासाठी साऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आम्ही तालुकानिहाय बैठका घेऊन जिल्ह्यातून नागरिक आणणार आहोत.’’ हा कार्यक्रम भव्यदिव्य करण्याचा निर्धार तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. दरम्यान, साऱ्यांनी कार्यक्रमस्थळी भेट दिली. त्याठिकाणी महापौरांनी विविध सूचना यावेळी दिल्या. तसेच परिसरात पार्किंगच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली.

Web Title: Sangli Demonstration Held During Lokarpana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..