
सांगली : महिलांचे आत्मबळ वाढवण्याचा निर्धार
सांगली: नवी आशा आणि नवी दिशा घेऊन वाटचाल करण्यासाठी सज्ज असलेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या यंदाच्या शताब्दी अधिवेशनाचा उद्घाटन सोहळा आज सकाळी थाटात झाला. जैन समाजाची शिखर संस्था असलेल्या सभेच्या या ऐतिहासिक सोहळ्यास नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींच्या पावन सान्निध्यात आणि सभा पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. धर्मध्वजवंदन, पदग्रहण सोहळ्यानंतर दिवसभर शाखांचे अधिवेशन पार पडले. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतून आलेल्या श्रावक-श्राविकांच्या उपस्थितीने वातावरण भारावून गेले. महिलांचा सन्मान आणि त्यांचे आत्मबळ वाढवण्याचा इरादा यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.
येथील नेमिनाथनगर कल्पद्रुम क्रीडांगणावर भव्य सभा मंडपात जैन सभेचे ऐतिहासिक अधिवेशन दोन दिवस चालणार आहे. उद्या (ता. १५) मुख्य दिवस आहे. आज उद्घाटन आणि शाखा अधिवेशनाची धामधूम सुरू झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात विस्तार असलेल्या सभेच्या या सोहळ्यासाठी हजारो लोक सांगलीत दाखल झाले आहेत. दिवाणबहादूर अण्णासाहेब लठ्ठेनगर असे नाव देण्यात आले असून, त्याचे उद्घाटन डॉ. भरत लठ्ठे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते धर्म ध्वजवंदन झाले. सहकार महर्षी स्व. शामराव पाटील यड्रावकर शांतिपीठ उद्घाटन माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या हस्ते झाले. राज्यमंत्री तथा अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. श्रावकरत्न रावसाहेब पाटील यांनी अध्यक्ष म्हणून पदग्रहण केले.
यावेळी चेअरमन रावसाहेब पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष माधव डोर्ले, डॉ. अजित पाटील, सहखजिनदार पा. पा. पाटील, खजिनदार संजय शोटे, अधिवेशनाचे कार्याध्यक्ष सुरेश पाटील, आमदार अभय पाटील, सचिव प्रा. एन. डी. बिरनाळे, खजिनदार सागर वडगावे आदी प्रमुख उपस्थित आहेत.
Web Title: Sangli Determination Womens Self Reliance Rsn93
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..