सांगली जिल्हा बँकेवर महाआघाडीची सत्ता; भाजपचा गुलाल 4 जागांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

अखेरचा निकाल मजूर संस्था गटातून समोर आला असून यातील दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे.

सांगली जिल्हा बँकेवर महाआघाडीची सत्ता; भाजपचा गुलाल 4 जागांवर

सांगली - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलने २१ पैकी १७ जागा जिंकल्या असून भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलने धक्कादायक निकाल नोंदवत चार जागांवर गुलाल नोंदवला आहे. महाडिक, जमदाडे यांची कमाल, दोन देशमुखांचा कमाल येथे दिसली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपची सरळ लढत झाली. त्यात तीन जागा बिनविरोध करत महाविकास आघाडीने आधीच गुलाल उधळला होता. उर्वरीत १८ जागांवर काय निकाल लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यात महविकास आघाडीला १४ जागा मिळाल्या असून ४ जागांवर भाजपच्या पॅनेलने बाजी मारली आहे.

हेही वाचा: Sangli Bank - भाजपचे महाडिक विजयी; महाविकासला मोठा धक्का

अखेरचा निकाल मजूर संस्था गटातून समोर आला असून यातील दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. विद्यमान उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि शिराळ्याचे सत्यजित देशमुख विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे सुनील ताटे, दिघंचीचे राष्ट्रवादीचे हणमंतराव देशमुख यांचा पराभव केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे आता ९, काँग्रेसकडे ५, शिवसेनेकडे ३ तर भाजपकडे ४ जागा आल्या आहेत.

विकास सोसायटी गटातून विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, आटपाडीतून शिवसेनेचे तानाजी पाटील, जतमधून भाजपचे प्रकाश जमदाडे, कवठेमहांकाळमधून शिवसेनेचे अजितराव घोरपडे, मिरजमधून काँग्रेसचे विशाल पाटील, कडेगावमधून काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम, तासगावमधून राष्ट्रवादीचे बी. एस. पाटील यांनी बाजी मारली आहे. या गटातून आधीच आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक आणि पलूसमधून महेंद्र लाड बिनविरोध झाले होते. महिला गटातील काँग्रेसच्या जयश्री पाटील, राष्ट्रवादीच्या अनिता सगरे यांनी बाजी मारली आहे. आरक्षित गटातून राष्ट्रवादीचे बाळासाहेब होनमोरे, मन्सूर खतीब, ॲड. चिमण डांगे यांनी विजय मिळवला आहे. प्रक्रिया गटातून दिवंगत आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील यांनी बाजी मारली आहे.

हेही वाचा: भाजपच्या पडळकर-देशमुखांना धक्का; तानाजीरावांचा अश्‍वमेध सुटला!

loading image
go to top