सांगली जिल्हा धोक्‍याच्या सीमेवर; दैनंदिन रुग्णसंख्येत  महिन्याभरात रुग्णांत 14 पट वाढ

Sangli district on the border of Danger; The daily number of patients increased 14 times in a month
Sangli district on the border of Danger; The daily number of patients increased 14 times in a month
Updated on

सांगली ः दैनंदिन रुग्णसंख्येत गेल्या महिन्याभरात सुमारे 14 टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. गेल्या एक मार्चला जिल्ह्यात 22 नवे रुग्ण निष्पन्न झाले होते, आज तब्बल 306 नवे रुण आढळले. ही वाढ दक्षिण महाराष्ट्रातील सर्वाधिक आहे. याच पटीने जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत राहिल्यास गेल्या वर्षीसारखी बिकट स्थिती अवघ्या आठवडाभरात उद्‌भवू शकते. जिल्हा साथीच्या उद्रेकाच्या उंबरठ्यावर असून नागरिकांनी गर्दी टाळणे आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग असलेल्या मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार या त्रिसूत्रीचा काटेकोर अंमल करण्याची वेळ आली आहे. 


जिल्ह्यात आज नवे 306 रुग्ण आढळले. आरटीपीसीआर 1470 चाचण्यांमधून 145 रुग्ण निष्पन्न झाले. 1262 अँटिजेन चाचण्यांमधून 168 नवे रुग्ण निष्पन्न झाले. आता मृत्यूचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. आज चौघांचा मृत्यू झाला. आजघडीला 244 रुग्णांची प्रकृती नाजूक आहे. जिल्ह्यातील कोरोना मृत्यूचा आकडा 1810 इतका झाला आहे. सांगलीची रुग्णसंख्या अन्य शेजारी जिल्ह्यापेक्षा आजघडीला कमीच आहे. मात्र, त्यातील वाढ चिंता वाटावी, अशी आहे. कारण साधारण तीन महिन्यांच्या कालावधीची संसर्गाची साथ दिसून येते. गतवर्षी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांत रुग्णसंख्येने शिखर गाठले होते. यावेळी मात्र अवघ्या महिन्याभरातच झालेली वाढ आणि आणखी पुढील दोन महिन्यांतील संभाव्य रुग्णसंख्या याच गतीने वाढली, तर दिवसाकाठी हजारांचा टप्पा महिन्याभरातच पार होऊ शकतो. त्यानंतर रुग्णांसाठी पुरेशी आरोग्य व्यवस्था उभी करणे बिकट होऊ शकते. जिल्ह्यात एक मार्चला फक्त 166 उपचाराखालील रुग्ण होते. आजघडीला ही संख्या 2470 इतकी झाली आहे. ही वाढही 14.88 पटीने अधिक आहे. म्हणजेच दैनंदिन रुग्णसंख्या आणि उपचाराखालील रुग्णसंख्या एकाच गतीने वाढताना दिसत आहे. 

दक्षिण विभागातील रुग्णांची स्थिती 

जिल्हा एक मार्च 3 एप्रिल वाढ (टक्‍के) 
कोल्हापूर 40 185 4.6
सांगली 22 306 13.90
सातारा 98 703 7.17
सोलापूर 93 516 6.1

लोक हलगर्जीपणा दाखवत आहेत
आमच्या बाह्य रुग्ण विभागात रोज चार ते पाच नवे रुग्ण निष्पन्न होत आहेत. जे गतवर्षीच्या साथकाळापेक्षा अधिक आहे. अशी वाढ पुढच्या बिकट आव्हानाची चाहूल देणारी आहे. यावेळी तरुणही बाधित व्हायचे प्रमाण अधिक आहे. सध्या मृत्युदर कमी वाटत असला, तरी पुढच्या टप्प्यात ज्येष्ठांमध्ये प्रादुर्भाव वाढत गेल्यानंतर मृत्यूचे प्रमाण वाढण्याचा मोठा धोका आहे. यावेळी एक-दोन दिवस ताप, किरकोळ सर्दी अशी लक्षणे आहेत. सर्वांत वेगळे लक्षण म्हणजे शौचास पातळ होणे, संडास लागणे. तुलनेने श्‍वसनाच्या तक्रारी कमी आहेत. जे ज्येष्ठांमध्येच अधिक दिसतेय. सर्वांत धोकादायक म्हणजे एकाच कुटुंबात रुग्णसंख्या मोठ्या संख्येने दिसतेय. लक्षणांबद्दल लोक हलगर्जीपणा दाखवत आहेत. लक्षणे दिसणारे लोक स्वतःला अलगीकरणात ठेवायला तयार नाहीत. माझे कळकळीचे आवाहन आहे, की लग्न, सभा, बैठका, जत्रा, बाजार अशा समूहाच्या कृती टाळा, अन्यथा संकट मोठे असेल. 
- डॉ. शिरिष चव्हाण, एम. डी. (मेडिसीन) 

थेट गुन्हे दाखल केले जातील
गृह अलगीकरणातील रुग्ण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. नियमांच्या पालनासाठी पोलिस दलाकडूनही सक्तीची वेळ आणू नका. यापुढे बिट हवालदार गृह अलगीकरणातील रुग्णांची रोज तपासणी करतील. जे रुग्ण नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत थेट गुन्हे दाखल केले जातील. 
- अजित टिके, शहर पोलिस उपाधीक्षक 

कोरोना जिल्ह्यात 

  • आजचे रुग्ण - 306 
  • उपचाराखालील रुग्ण -2470 
  • बरे झालेले रुग्ण -48236 
  • एकूण रुग्ण -52516 
  • आजअखेरचे मृत्यू -1810 
  • बाधित रुग्णांपैकी चिंताजनक -244 
  • ग्रामीण भागातील बाधित -26713 
  • शहरी भागातील बाधित -7871 
  • मनपा क्षेत्रातील बाधित -17932 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com