सांगली जिल्हा कारागृह हाऊसफुल्ल; प्रशासनाची कसरत, 197 पॉझिटिव्ह

शैलेश पेटकर
Friday, 2 October 2020

कोरोनाच्या संकट काळत सांगली येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी हाऊसफुल्ल झाले असून, प्रशसनला दररोज कसरत करावी लागते.

सांगली : कोरोनाच्या संकट काळत येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी हाऊसफुल्ल झाले असून, प्रशसनला दररोज कसरत करावी लागते. कैद्यांची क्षमता 235 इतकी असताना सध्या 341 कैदी आहेत. नव्या जागेचा प्रस्ताव लालफीतीत अडकला असून प्रशासनावर मोठा ताण दिसून येत आहे. 

सांगलीतील कारागृह ब्रिटिशकालिन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक घडामोडीचा साक्षीदार म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. कारागृह न्यायालयीन बंदी आणि तीन महिन्यांपर्यंत किरकोळ शिक्षा झालेल्या आरोपींसाठी आहे. गेल्या वर्षभरात गुन्हेगारी वाढल्यामुळे विविध गुन्ह्यातील संशयित आरोपी पोलिस कोठडीनंतर जामीन मंजूर होईपर्यंत कारागृहात पाठवले जातात. त्यामुळे कारागृहातील कैद्यांची संख्या वाढत आहे.जिल्हा कारागृहातील पुरुष आणि स्त्री कैदी मिळून क्षमता 235 इतकी आहे. सध्यस्थितीत 341 कैद्यी याठिकाणी आहेत. त्यात 22 महिलांचाही समावेश आहे. यातील पन्नास टक्के कैदी गंभीर गुन्ह्यातील आहेत. 

दुसऱ्या बाजूला कारागृह प्रशासनाकडे असणाऱ्या अपुऱ्या संख्याबळावरमुळे नियंत्रण ठेवण्यात कसरत करावी लागते आहे. कैद्यात भांडणे होऊ नयेत यापासून ते त्यांचे हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागते. तसेच कैद्यांना प्रबोधनही करावे लागते. अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कैद्यावर सतत नजर असल्यामुळे ताण थोडासा कमी झाला आहे. 

कारागृहासाठी प्रशस्त जागा दिली जाईल, असा निर्णय झाला होता. चार ते पाच वर्षांत हा प्रस्ताव लालफीतीतच अडकून पडला आहे. यापूर्वी विमानतळाची जागा कारागृहासाठी मागणी करण्यात आली होती. मात्र, तोही प्रस्ताव नाकारण्यात आला. कारागृह प्रशासनास कोणी जागा देता का, अशी अवस्था झाली आहे. 

कोथळे प्रकरणातील कैदी 
कोथळे प्रकरणातील संशयित कैद्यांनाही याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सुनावणीसाठी अंतर जवळ पडावे, यासाठी त्यांना येथे ठेवले आहे. त्यामुळे मोठा ताण प्रशासनावर आहे. 

कारागृहात 197 पॉझिटिव्ह 
कोरोनामध्ये मोठी संख्या कारागृहात होती. कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर एका पाठोपाठ 179 जणांना लागण झाली. तसेच 8 प्रशासनातील व्यक्तींनाही लागण झाली. त्यानंतर स्वतंत्र अलगीकर कक्ष करण्यात आला. आता दहा जण वगळता सारेच कोरोनामुक्त झाले आहेत. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli District Jail Housefull; stress on Administration, 197 Positive