सांगली जिल्हा खो-खो संघटना निवडणूक नियमबाह्य

घनशाम नवाथे 
Wednesday, 3 February 2021

सांगली जिल्ह्यातील दि ऍमॅच्युअर खो-खो असोसिएशनची नुकतीच झालेली निवडणूक प्रक्रिया राज्य खो-खो संघटनेच्या शासकीय परिषदेत नियमबाह्य व घटनाबाह्य ठरवली आहे.

सांगली : जिल्ह्यातील दि ऍमॅच्युअर खो-खो असोसिएशनची नुकतीच झालेली निवडणूक प्रक्रिया राज्य खो-खो संघटनेच्या शासकीय परिषदेत नियमबाह्य व घटनाबाह्य ठरवली आहे. तसेच जिल्हा खो-खो साठी पाचजणांची अस्थायी समिती नियुक्त केली. ही समिती सहा महिने जिल्ह्याचे कामकाज चालवणार आहे.

दि ऍमॅच्युअर खो-खो असोसिएशनची निवडणूक प्रक्रिया महिन्यापूर्वी घेण्यात आली होती. संघटनेच्या अध्यक्षपदी कवठेपिरानचे माजी सरपंच भीमराव माने यांची निवड करण्यात आली. या निवडीमध्ये सांगली, कुपवाड, मिरजेसह वाळवा येथील प्रतिनिधींना डावलण्यात आले होते. शहरी व ग्रामीण असा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य संघटनेकडे या निवडीबाबत तक्रार करण्यात आली होती असे समजते. त्यामुळे जिल्हा संघटना निवडणुकीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. 

दोन दिवसांपूर्वी पुणे येथे राज्य खो-खो संघटनेच्या शासकीय परिषदेची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा संघटना निवडणुकीबाबत चर्चा झाली. त्यावेळी जिल्ह्यात झालेली निवडणूक प्रक्रिया नियमबाह्य व घटनाबाह्य ठरवत निवडणूक प्रक्रियेस स्थगिती दिली. संघटनेची घटनेप्रमाणे निवडणूक होईपर्यंत अस्थायी समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अस्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून सचिन गोडबोले (पुणे), सदस्य म्हणून डॉ. समीर शेख, गिरीश भट, योगेश पवार, किरण मेटकरी (सर्व सांगली) यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य संघटनेचे सरचिटणीस ऍड. गोविंद शर्मा यांनी सर्वांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. 

अस्थायी समितीद्वारे निवडण्यात आलेले सांगली जिल्ह्याचे संघ राज्य अजिंक्‍यपद स्पर्धेत सहभागी होतील असा ठराव संमत करण्यात आला. अस्थायी समिती भारतीय खो-खो महासंघ, राज्य खो-खो संघटना यांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे सहा महिने जिल्ह्याचे कामकाज बघणार आहे. तसेच या समितीच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटनेची निवडणूक प्रक्रिया देखील पार पाडली जाणार आहे. 

अस्थायी समिती नियुक्तीचे स्वागत
जिल्हा संघटनेची निवडणूक काहींना डावलून करण्यात आली होती. शहरी व ग्रामीण असा निवडणुकीला रंग देण्यात आला होता. अखेर तक्रारीनंतर अस्थायी समिती नियुक्त केल्यामुळे निर्णयाचे स्वागत होत आहे. समितीच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या आगामी निवडणुकीकडे खो-खो प्रेमींची लक्ष लागले आहे.

संपादन :  युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli District Kho-Kho Association Election