esakal | मोबाईल न दिल्याच्या रागातून खून 
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli district labour murdered his young friend

सोनूकुमारने त्याला बिहारमध्ये घरी फोन करण्यासाठी मोबाईल मागितला. सिकंदरने नकार दिला. त्यावरून दोघांत भांडण झाले.

मोबाईल न दिल्याच्या रागातून खून 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


शिरढोण (जि. सांगली) : नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे रत्नागिरी-नागपूर महामार्गावर परप्रांतीय तरुण मजुराचा मोबाईल न दिल्याचा राग मनात धरून खून करण्यात आला. सिकंदर हरिप्पा गंजू (वय 20, रा. राजगुरू, पोस्ट सिबला, ता. बालुमाथ, जि. लाथेहर, झारखंड) असे खून झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी (ता. 6) रात्री अकराच्या दरम्यान घडला. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात याची नोंद आहे. संशयित सोनूकुमार शंभूसिंग (28, रा. आधावरी, पोस्ट केशमनगर, ता. चौथम, जि. खंगाडी, बिहार) याला अटक झाली आहे. त्याने लोखंडी रॉडने मारहाण व गळा दाबून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : महामार्गावर पुलाची कामे सुरू आहेत. झुरेवाडी हद्दीत नरसिंहगाव, शिरढोण आदी ठिकाणी झारखंड, बिहार, मध्य प्रदेश आदी राज्यांतील मजूर काम करीत आहेत. सिकंदर व सोनूकुमारसह अन्य मजूर झुरेवाडीजवळ एका खोलीत एकत्र राहत होते. दिलीप बिल्डकॉन कंपनीचा ठेकेदार नागराजकडे सर्व कामास होते. सिकंदर व्यसनी होता. सोनूकुमारने त्याला बिहारमध्ये घरी फोन करण्यासाठी मोबाईल मागितला. सिकंदरने नकार दिला. त्यावरून दोघांत भांडण झाले. नंतर खोलीत सर्व जण जेवण करून झोपी गेले. मध्यरात्री सोनूकुमार सिकंदरला बाहेर घेऊन आला. तेथून नरसिंहगाव येथील टेकडीवर निर्जनस्थळी नेले. तेथे दोघांचे कडाक्‍याचे भांडण झाले. "मला घरी फोन करण्यासाठी मोबाईल का दिला नाही' म्हणून सोनूकुमारने त्याला मारहाण सुरू केली. सोनूकुमारने रॉडने त्याच्या डोक्‍यावर, छातीवर वार केला. गळा दाबून खून केला. तेथून तो खोलीत येऊन बसला. सिकंदर कोठे आहे, असे तो विचारू लागला. 

श्वान पथकाने काढला माग

पोलिसांनी आणलेल्या श्‍वानाने घटनास्थळापासून मजुरांच्या खोलीपर्यंत माग काढला. संशयिताला लगेच ताब्यात घेण्यात आले. याबाबत संजीवकुमार गीतादेवी राजेंद्र (रा. शहारपूर, बिहार) यांनी फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, सहायक निरीक्षक राहुल कोळंबीकर, उपनिरीक्षक दीपाली गायकवाड, हवालदार संतोष बेमडे, तावरे यांनी तपास केला.