सांगली : खाद्यतेलाची दरवाढ आवाक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

oil

सांगली : खाद्यतेलाची दरवाढ आवाक्यात

सांगली : जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात १५ किलोच्या डब्यामागे २०० ते ५०० रुपयांनी घट झाली आहे. किरकोळ बाजारातही किलोला २० ते ३० रुपयांपर्यंतची घट झाली आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या खाद्यपदार्थांच्या किमती मात्र कायम आहेत. त्या कमी होतील काय, याकडे ग्राहकांचे लक्ष आहे. भविष्यात खाद्यपदार्थ दरवाढ नियंत्रणासाठी हॉटेल ग्राहक संघटनाच अस्तित्वात येण्याची गरज आहे.

देशात अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असताना खाद्यतेल स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. २४ जुलैनंतर दरात मोठी घट झाली आहे. शेंगदाणा तेलाचे दर मात्र स्थिर आहेत. सर्वाधिक खपाचे पामतेल १५ किलोच्या डब्यामागे ४५० ते ५०० रुपये, सरकीतेल सर्वसाधारण २२५ ते ३००, सूर्यफूल तेलाचे दर १५० रुपयांनी घटले. या पार्श्‍वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांकडून खाद्यपदार्थांच्या दरात घट अपेक्षित होती. प्रत्यक्षात त्यांचे दर कायम आहेत.

बाजारात शेंगदाणा तेलाचे दर मात्र गेल्या काही दिवसांपासून टिकून आहेत. शेंगदाणा तेलाचे उत्पादन राज्यातच होते. महिनाभरापूर्वी विविध प्रकारच्या खाद्यतेलाच्या दरांनी उच्चांक गाठला होता. त्यामुळे घाऊक; तसेच किरकोळ बाजारात खाद्यतेलाची खरेदी करताना ग्राहकांना विचार करावा लागत होता; मात्र आता सरकारने परदेशातून खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात केल्यामुळे दरात मोठी घट झाली होती.

जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत राहील, तोपर्यंत खाद्यतेलांच्या दरात वाढ होणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंडोनेशियातून खाद्यतेलाचा पुरवठा कमी झाला होता.

त्यामुळे पामतेलाचे भाव आवाक्याबाहेर गेले होते. परंतु आता तेलाचा पुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे घाऊक बाजारपेठेसह किरकोळ बाजारातील खाद्यतेलांच्या दरात घट झाली आहे.

देशात पामतेलाची आयात झाल्यामुळे दर घटले. अन्य तेलांत फार मोठी घट झालेली नाही. उलट देशाच्या, राज्याच्या राजधानीतून आलेल्या वृत्तांमुळे ग्राहक, दुकानदार यांच्यात सतत वादावादीच्या घटना घडल्या. दहा दिवसांपूर्वी वाढलेले दरही चार दिवसांत पुन्हा लिटरला चार ते पाच रुपयांनी वाढले आहेत.

- नटवरलाल लड्डा, ज्येष्ठ व्यापारी

गेल्या पंधरवड्यापासून खाद्यतेलांचे दर घटले असले तरी गॅस, कोळसा आणि भाजीपाल्यांच्या दरातील तेजी कायम आहे. खरेतर व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांची दरवाढच केलेली नाही. भविष्यात ती करावी लागेल, असे सध्याचे चित्र आहे.

- लहू बडेकर, अध्यक्ष, हॉटेल व्यवसाय संघटना

जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक संरक्षण परिषद आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी तिचे सचिव आहेत. खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याबाबतचे लेखी आदेश केंद्र सरकारने प्रशासन व व्यावसायिकांना दिले आहेत. त्यांचीही पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. तसेच हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर घटले की नाही, हे पाहण्याचीही जबाबदारी याच समितीची आहे. गेली सात वर्षे या समितीची बैठकच झालेली नाही.

- डॉ. ज्ञानचंद्र पाटील, अध्यक्ष, ग्राहक पंचायत, सांगली

Web Title: Sangli Edible Oil Price Hike Within Reach

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top