#SangliFlood महापुराचा महाविक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे.

सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे.

एक नजर

 •   जिल्ह्यातील १.२५ लाख लोकांचे स्थलांतर
 •   एनडीआरएफ, टेरिटोरियल आर्मीची पथके पाचारण, २११ जवानांचा समावेश
 •   कोयना, वारणा, अलमट्टी धरण 
 • प्रशासनाशी समन्वय
 •   जिल्ह्यातील ५३ मार्ग पाण्याखाली
 •   मिरज रेल्वे मार्गावरील अनेक रुळांवरही पहिल्यांदाच पाणी 
 •   कोल्हापूर-मुंबई रेल्वे मार्ग बंद
 •   नदीकाठावरील ४० गावांचा संपर्क तुटला
 •   एस. टी. महामंडळाकडील २० मार्ग बंद
 •   पूरबाधित तालुक्‍यात वैद्यकीय सुविधा
 •   पावसामुळे १२४ घरांची पडझड 
 •   बांधकामच्या २२ पूल, रस्त्यांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट

जिल्ह्यातील सव्वा लाखाहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. दरम्यान, नदीतील मगरी आता नागरी वस्तीत घुसू लागल्याने लोक भयभीत झाले आहेत. एनडीआरएफच्या टीम पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. सांगली महापालिका क्षेत्रात मालमत्तांचे, भव्य शोरूम व दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातून दोघे जण वाहून गेले, तर एक महिला भिंत कोसळून ठार झाल्याने जीवितहानीही झाली आहे.

सांगलीत महापुराने शहराला वेढा घातला आहे. रात्रभर पावसाचा जोर ओसरला असला तरी कोयना धरणातून सोडलेल्या एक लाख २१ हजार क्‍युसेक पाण्याने कृष्णेच्या पाणीपातळीमध्ये मात्र वाढ होत आहे. इतिहासात प्रथमच अशा ठिकाणी कृष्णेचे पाणी घुसले, की आजपर्यंतच्या अनेक पुरांना पाहणाऱ्या सांगलीचे आराध्य दैवत असलेल्या गणेश मंदिरातील कमानीतून आत पाणी शिरले. महापालिका मुख्यालयासह जुना स्टेशन रोडवरील आझाद चौकापर्यंत पाणी आले आहे.

शहरातील सराफ कट्टा, मेन रोड, हरभट रोड, एसटी स्टॅंड, महापालिका चौक, राजवाडा चौक, स्टेशन चौक, शामरावनगर, गावभाग, टिळक स्मारक, मल्टिप्लेक्‍स या सर्व ठिकाणी पाणी पसरले आहे. मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याला चबुतऱ्यापर्यंत पाणी लागले आहे. हे सगळे पहिल्यांदा घडते आहे. एनडीआरएफ, टेरिटोरियल आर्मीची पथके दाखल झाली आहेत. पुनर्वसनाचे काम युद्धगतीने सुरू आहे. ५३ हजारांहून अधिक लोक व १६ हजारांहून अधिक जनावरांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. 

सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), टेरिटोरियल आर्मी, कोल्हापूर, पुणे-चिंचवड महानगरपालिका पथक अशा पथकांना पाचारण करण्यात आले असून, यामध्ये २११ जवानांचा समावेश आहे. ही पथके इस्लामपूर - वाळवा, मिरज, पलूस या तालुक्‍यांत बचावकार्य करत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाख लोक व २५ हजार जनावरांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. 

कोयना पाणलोट क्षेत्रात बुधवारी सकाळी आठपर्यंत सरासरी २०० मिलिमीटर पाऊस पडला. तो गेल्या चार दिवसांपेक्षा १०० ते १२५ मिलिमीटरने कमी आहे. कोयना, महाबळेश्‍वर, नवजा, धोम, कन्हेर धरण परिसरात बुधवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत पाऊस कमी झाला होता; मात्र सायंकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढल्याचे सांगण्यात आले. चांदोली धरण परिसरातही पावसाचे प्रमाण घटले आहे. यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी कऱ्हाड येथे सकाळी तीन फुटांनी घटली आहे.

वाळवा तालुक्‍याला सर्वाधिक पुराचा फटका बसला आहे. तालुक्‍यातील ३९ हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले. बोरगाव, वाळवा, बहे, शिरगाव, ढवळी, सूर्यगाव, नागठाणे या गावांना फटका बसला आहे. मिरज तालुक्‍यातील नांद्रे, पद्माळे, कर्नाळ, हरिपूर, अंकली, तुंगसह, डिग्रज या गावांतून पुराने थैमान घातले आहे. पलूस तालुक्‍यातील औदुंबर, भिलवडी, अंकलखोप, धनगाव, दुधोंडी, वसगडे आदी गावांना पुराने वेढले आहे. 

पूरग्रस्तांना मदतीसाठी राजकीय नेते व कार्यकर्तेही पुढे सरसावले आहेत. सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ, खासदार संजय पाटील, युवा नेते विशाल पाटील, श्रीमती जयश्रीताई पाटील, मिरजेत मंत्री सुरेश खाडे, मनोज शिंदे-म्हैसाळकर, महापौर संगीता खोत, वाळवा तालुक्‍यात राष्ट्रवादीचे जयंत पाटील, मंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, सम्राट महाडिक, कडेगाव-पलूसमध्ये आमदार विश्‍वजित कदम, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार पृथ्वीराज देशमुख आदींसह नेते, कार्यकर्ते मदतकार्यात सक्रिय राहिले.

कोयना, वारणा धरणातून विसर्ग
कोयना धरणाची क्षमता १०५.२४ टीएमसी असून पाणीसाठा १०२.२१ टीएमसी (९७ टक्के) आहे. धरणातून १ लाख २२ हजार ४७५ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. बुधवारी दुपारनंतर तो ३ हजारांनी घटवून १.१९ लाखांवर आणण्यात आला आहे. वारणा धरणाची क्षमता ३४.४० टीएमसी असून पाणीसाठा ३२.२६ टीएमसी (९३.७७ टक्के) आहे. धरणातून ३० हजार ११४ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग आहे. आलमट्टी धरणाची क्षमता १२३ टीएमसी असून पाणीसाठा ९२.८५ टीएमसी (७५ टक्के) आहे. बुधवारी दिवसभर ४ लाख २४ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  

कोयना, वारणा, अलमट्टी धरण प्रशासनाशी समन्वय
सांगली जिल्ह्यामध्ये मिरज, पलूस, वाळवा व शिराळा या तालुक्‍यांतील नदीकाठची एकूण १०७ गावे पूरप्रवण असून, धरणातून होणाऱ्या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरण, पाटबंधारे विभाग, वारणा धरण, अलमट्टी धरण-प्रशासन यांच्याशी समन्वय ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी बेळगाव, विजापूर, अलमट्टी प्रशासन यांना अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी ५१८ मीटर ते ५१८.५० मीटरपर्यंत स्थिर ठेवण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात ४८१ मिलिमीटर पाऊस....
 जिल्ह्यात सरासरी ४८१.८ मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. १ जूनपासून ७ ऑगस्टच्या सकाळी ८ वाजेपर्यंत अखेर सरासरी ४८१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक पाऊस शिराळा (१४२९.२ मि. मी.), वाळवा (५८२.६ मि. मी.) आणि सर्वात कमी पाऊस आटपाडी (१७७.८ मि. मी.), जत (१६९.५ मि. मी.) या तालुक्‍यांमध्ये झाला आहे. 

शेती नुकसान
कृष्णा-वारणा नदीकाठावरील ११७ गावांतील सुमारे ३० हजार एकरांवरील ऊस, केळी, भाजीपाला, सोयाबीन, मक्का पिकांचे सुमारे २०० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शाळांचे ५० लाखांचे नुकसान...
नदीकाठावरील सुमारे ४५ गावांतील प्राथमिक शाळा, माध्यमिक आणि महाविद्यालयातील शाळांतील ग्रंथालय, प्रयोगशाळेतील साहित्यांचे सुमारे ५० लाखांवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

महापुरातून 
० जिल्ह्यातील २२ राज्य मार्ग, २९ प्रमुख जिल्हा मार्ग, १ इतर जिल्हा मार्ग व १ ग्रामीण रस्ता पाण्याखाली गेला आहे. कोल्हापूर ते मुंबई रेल्वेमार्ग बंद आहे. तर एसटी महामंडळाकडील २० मार्ग बंद 
० कापूसखेड (ता. वाळवा) येथे भिंत पडून अबिदा बालेखान मुजावर (वय ५५) यांचा मृत्यू झाला. बहे (ता. वाळवा) येथील प्रतीक पोपट आवटे (वय १८) नदीपात्रात वाहून गेला आहे. 

मदत किती मिळणार? 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नुकसानभरपाईबाबत माहिती देताना यापूर्वी जी भरपाई दिली जात होती त्यापेक्षा वाढ करण्यात आल्याचे सांगितले. दहा ते पंधरा हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे सूचित केले. यापूर्वी माणशी दोन हजार अशी ही नुकसानभरपाई होती.  

 पोलिस प्रशासन चोवीस तास रस्त्यावर
गेल्या चार दिवसांपासून मदतकार्य पोहचवण्यासाठी व पूरग्रस्तांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी पोलिस प्रशासन चोवीस तास रस्त्यावर आहे. पाण्याची पातळी वाढेल त्याठिकाणी पोहचून नागरिकांना बाहेर पडण्यासाठी आवाहन केले जात आहे. खुद्द पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा हेही फिल्डवर उतरून पूरग्रस्तांची मदत करत आहेत. वाहतूक सुरक्षित करण्यासाठीही वाहतूक शाखेचे पोलिस दक्ष आहेत.

गावभागात मगर सापडली
कृष्णा नदीत असलेल्या मगरी आता पुराबरोबर नागरी वस्तीत घुसल्या आहेत. आज गावभागात अमरधामजवळील एका अपार्टमेंटच्या तळमजल्यावर मगर सापडली. पाण्यातून आलेली मगर तळमजल्यावर एका कोपऱ्यात बसल्याचे नागरिकांना दिसून आले. त्यांनी तातडीने बचाव पथकाला त्याची माहिती दिली. बचाव पथकाने अपार्टमेंटजवळ येऊन मगरीला पकडले.

बोटींची कमतरता...
जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद प्रशासनाच्या पूरग्रस्तांसाठी उपलब्ध असलेले साहित्य कमी पडू लागले आहे. आज दिवसभरात अनेक ठिकाणाहून आपत्ती व्यवस्थापन कक्षाला नागरिकांनी मदतीसाठीची मागणी केली. मात्र त्यांच्याकडून मागणींकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे मत आहे. सांगलीवाडी, शामरावनगर येथे नागरिक मोठ्या संख्येने अडकून राहिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगली दौऱ्यावर
पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, तसेच पाटबंधारेमंत्री गिरीश महाजन सांगली दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्याची पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी खास सेलद्वारे स्वतंत्र यंत्रणा उभी केल्याचे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Flood situation 55 foot water level Krishna River