#SangliFloods कृष्णा - वारणा नद्यांचा पूर लागला ओसरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

सांगली - जिल्ह्यात कृष्णा - वारणा नद्यांना आलेला पूर ओसरू लागला आहे. सांगलीतील आयर्विन पुलावर दुपारी चारपर्यंत ५३ फुटांवर पाणीपातळी आली आहे. कृष्णा नदीच्या पात्रात पाणी जाण्यासाठी दोन दिवस लागतील. जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी जिल्ह्यासह राज्यातील कानाकोपऱ्यातून मदत येत आहे. मात्र, गरजूंपर्यंत मदत पोचविण्याचे आव्हान आहे.

सांगली - जिल्ह्यात कृष्णा - वारणा नद्यांना आलेला पूर ओसरू लागला आहे. सांगलीतील आयर्विन पुलावर दुपारी चारपर्यंत ५३ फुटांवर पाणीपातळी आली आहे. कृष्णा नदीच्या पात्रात पाणी जाण्यासाठी दोन दिवस लागतील. जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी जिल्ह्यासह राज्यातील कानाकोपऱ्यातून मदत येत आहे. मात्र, गरजूंपर्यंत मदत पोचविण्याचे आव्हान आहे.

जिल्ह्यातील सैन्य, एनडीआरएफ, एसडीआरएफची पथकांचे लोकांना बाहेर काढण्याचे काम थांबवले असून त्यांच्याकडून लोकांना मदत पोहोचवण्याचे काम सुरू झाले आहे. महापालिकेने जोरदार स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

सांगली जिल्ह्यातील वारणा-कृष्णा नदीकाठावरील ११७ गावांना पुराचा फटका बसला आहे. जिल्ह्यातून किमान पावणेदोन लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून ५० हजार जनावरांनाही वाचवण्यात आले आहे. महसूल विभागाने पंचनामे सुरू केले असून दोन दिवसात पंचनामे पूर्ण होणार आहेत. 

गेली आठवडाभर महापुराची धास्ती कमी झाल्याने पूरग्रस्तांसह सर्वांनीच सुटकेचा श्‍वास घेतला आहे. पाणी कमी होत असले तरीही चौकाचौकात पोलिस, प्रशासनाने दक्षता म्हणून बंदोबस्त ठेवला आहे. बाहेरगावाहून मदत आलेली पूर तसेच स्थलांतरित शाळा, महाविद्यालयात वाटप सुरू आहे. 

जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने पूरग्रस्त मदत वाटपात सुसूत्रता येण्यासाठी एकत्रित नियोजन केले आहे. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. गॅससाठीही लोकांची धडपड सुरू आहे. अनेक ठिकाणी सखल भागातील पाणी काढण्यासाठी पंप सुरू झाले असून, काहींकडून शोधाशोध सुरू आहे. नुकसान झाल्याचा अंदाज येत असल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते आहे.  

पूर ओसरू लागल्याने अनेक जण आपापल्या घरात जात आहेत. या ठिकाणी घरात मोठ्या प्रमाणावर गाळ, घुशी, उंदरे मरून पडली आहेत. गुंठेवारी भागातील अनेक घरांत साप सापडत आहेत. शहरासह जिल्ह्यातील सर्पमित्रांना दिवसभरात मदतीसाठी २० ते ३० फोन येत आहेत. जसजसा पूर ओसरेल तसे मृत झालेली जनावरे सापडू लागली आहेत. दुपारपर्यंत महापालिकेने शंभरावर मृत प्राण्यांचे शव बाहेर काढली आहेत. शिराळा, पलूस तालुक्‍यातील पूर ओसरत असून त्यांच्याकडेही मदत येत आहे. पूरग्रस्तांना मदतीसाठीचे शेती नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहे. जनावरांसाठी मोठ्या प्रमाणावर चाऱ्यांची कमतरता भासते आहे.

जिल्हा परिषदेने पशुसंवर्धनासाठी केरळहून वैद्यकीय पथक मागवले आहे. पुरात आतापर्यंत एक हजारहून अधिक घरे पूर्णपणे पडली असून पडझड झालेल्या घरांची संख्याही मोठी आहे. संपूर्ण जिल्ह्यात पूर ओसरल्यानंतर पाणीपुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांचे युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे.

धरणांतील पाणीसाठा (टीएमसी)
- वारणा- ३२.४६
- कोयना- १०३.२०
- अलमट्टी- ८८.७६

धरणांतल विसर्ग (क्‍युसेक)
- वारणा - १६ हजार ६५७
- कोयना - ५३ हजार ८८२
- अलमट्टी - ५ लाख ३० हजार

- आयर्विन पुल सांगली येथे ५३ फूट पाण्याची पातळी आहे. (धोका पातळी ४५ फूट).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Floods water level decreases in Krishna, Warana