esakal | सांगलीत सक्‍तीने "शटर डाऊन'; व्यापाऱ्यांच्या बैठकांच्या फेऱ्या 
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli forced "shutter down"; rounds of traders' meetings

व्यापाऱ्यांनी पहिल्या दिवशी मिनी लॉकडाऊनला केलेल्या आक्रमक विरोधानंतर आज प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याने शहरात शटर डाऊन झाले.

सांगलीत सक्‍तीने "शटर डाऊन'; व्यापाऱ्यांच्या बैठकांच्या फेऱ्या 

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : व्यापाऱ्यांनी पहिल्या दिवशी मिनी लॉकडाऊनला केलेल्या आक्रमक विरोधानंतर आज प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याने शहरात शटर डाऊन झाले. कापडपेठ, सराफ कट्‌टा, मेन रोड, मारुती रोड, गणपती पेठ या बाजारपेठेत अत्यावश्‍यक सेवेची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहिली. सांगली शहरात आज सकाळपासूनच बाजारपेठ बंद होती. 

अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन बंदचे आवाहन केले. काल मंगळवारी व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला विरोध करत दुकाने उघडी ठेवली होती. मात्र, प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय राज्य शासनाचा असल्याने त्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. त्यामुळे बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्याला व्यापाऱ्यांनी आज अगदी नाईलाजास्तव प्रतिसाद देत आज व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन पाळला. त्यामुळे गणपती पेठ, मारुती रोड, मेन रोड, सराफ कट्‌टा कापडपेठ या सगळ्या ठिकाणी शटर डाऊन असलेले दिसून आले. दरम्यान विरोधासाठी व्यापाऱ्यांच्या आज दिवसभर बैठका सुरू होत्या. 

अप्पर तहसीलदार अर्चना पाटील, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर तसेच महापालिकेचे अधिकारीही बाजारपेठेत फिरुन बंदचे आवाहन करत होते. दुकान बंद करुन दुकानांसमोर मालक, कामगार बसून असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत होते. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार महसूल, महापालिका आणि पोलिस प्रशासन सध्या बंदचे आवाहन करत आहेत. दुध डेअरी, बेकरी तसेच जीवनावश्‍यक वस्तूची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. नागरिकांनीही सहकार्य करावे. 
- सौ. अर्चना पाटील, अप्पर तहसीलदार 

आस्थापनांत गर्दी, बाजारपेठेत शुकशुकाट... 
शासनाच्या आदेशानुसार शहरातील औषध दुकाने, दूध डेअरी, किराणा दुकाने, धान्य दुकाने, बेकरी, पेट्रोल पंप तसेच मार्केट यार्डमधील दुकाने सुरु होती. मात्र, तेथेही फारशी गर्दी नव्हती. शिवाय खासगी कार्यालये, बॅंका सुरळीत चालू होत्या. त्यामुळे या आस्थापनांमध्ये गर्दी तर बाजारपेठेत शुकशुकाट असे चित्र होते. 

मिनी लॉकडाऊनबाबत राज्यात असंतोष आहे. व्यापाऱ्यांस कोणतीही मदत न देता अन्यायकारक टाळेबंदी लादली जात आहे. उद्या प्रमुख असोसिएशन तसेच सर्वच पक्षांचे पदाधिकारी बसून निर्णय घेऊन सर्व व्यवसाय शुक्रवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेत आहोत. उपासमार होण्यापेक्षा दुकाने सुरू करू, त्याबद्दल गुन्हे दाखल करा. 
- समीर शहा, अध्यक्ष, व्यापारी संघटना 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

loading image