
सांगलीत बेदाणा व्यापाऱ्याची अकरा लाखांची फसवणूक
सांगली: मार्केट यार्डमधील बेदाणा व्यापाऱ्यास ११ लाख ४० हजार ९२० रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी व्यापारी विजय शंकर माळी (वय ५१, रा. नदीवेस, मिरज) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित पराग नरेंद्र भांदेकर, रोनक देशपांडे (दोघे रा. पुणे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विजय माळी यांचे येथील मार्केट यार्ड येथे अवधूत ट्रेडिंग कंपनी नावाचे अडत दुकान आहे. ४ एप्रिल २०१९ ते ३ नोव्हेंबर २०२१ दरम्यान संशयित पराग भांदेकर आणि रोनक देशपांडे यांनी माळी यांचा विश्वास संपादन करून सुरवातीला त्यांच्याकडून बेदाणा घेतला होता. त्याचे पैसेही त्यांनी माळी यांना दिले होते. त्यामुळे संशयितांनी माळी यांचा विश्वास मिळवला. त्यातून त्यांनी त्यांच्या कंपनीच्या नावे माळी यांच्याकडून ११ लाख ४० हजार ९२० रुपयांचा बेदाणा माल घेतला. मात्र, त्याचे पैसे त्यांनी दिले नव्हते. माळी यांनी संशयितांकडे वारंवार पैशांची मागणी केली. मात्र त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली; शिवाय फिर्यादी विजय माळी यांचे भाऊ विनोद यांचीही संशयितांनी फसवणूक केली. याबाबत विजय माळी यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले.