esakal | Sangli : स्वीकृत सदस्यवरून काँग्रेसमध्ये घमासान
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

Sangli : स्वीकृत सदस्यवरून काँग्रेसमध्ये घमासान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : विरोधी पक्षनेते पदापाठोपाठ स्वीकृत सदस्य निवडीवरूनही काँग्रेसमध्ये नाराजीने घमासान निर्माण झाले आहे. राजेश नाईक यांच्या नावावर काँग्रेसच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केले असले तरी त्यांच्या नावाला विरोध सुरू झाला आहे. राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे कट्टर समर्थक मयूर पाटील यांनी स्वीकृतसाठी नेत्यांकडे हट्ट धरला आहे, तर मदन पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जयश्री पाटील यांची भेट घेऊन नाईक यांच्या नावाला विरोध केला आहे.

काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक करीम मिस्त्री यांनी सोमवारीच नेत्यांच्या आदेशानुसार पदाचा राजीनामा दिला. पाठोपाठ काँग्रेसच्या नेत्यांनी राजेश नाईक यांचे नाव स्वीकृतसाठी निश्चितही केले, पण हा निर्णय घेताना पक्षाच्या नगरसेवकांना किंवा स्वीकृत इच्छुक कार्यकर्त्यांशीही चर्चा केली नाही. त्यामुळे नाईक यांचे नाव समोर येताच काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटले. स्वीकृत सदस्य यासाठी मयूर पाटील यांच्यासोबत अमर निंबाळकर, ॲड. भाऊसाहेब पवार, आनंदा लेंगरे, शीतल लोंढे, सांगलीवाडीचे विजय पाटील इच्छुक आहेत. या सर्व इच्छुकांनी आज जयश्री पाटील यांची भेट घेऊन राजेश नाईक यांच्या नावाला विरोध दर्शवला.

महापालिका निवडणुकीवेळी नाईक यांनी बंडखोरी केली होती. त्याचा पक्षाला फटका बसला.शिवाय गेली तीन वर्षे ते पक्षाशी संबंधित नव्हते, तरीही त्यांचे नाव थेट स्वीकृतसाठी नेत्यांनी समोर आणल्याने नगरसेवक, कार्यकर्त्यांना धक्का बसला. त्यांनी जयश्री पाटील यांची आज भेट घेऊन त्यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार नाही का, असा सवालही यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. स्वीकृतसाठी इच्छुक असलेले प्रमुख दावेदार मयूर पाटील यांनी मुंबईत कृषिमंत्री विश्वजित कदम यांची भेट घेऊन मागणी केली आहे. महापालिका निवडणुकीवेळी त्यांना थांबवण्यात आले होते. त्यावेळी उत्तम साखळकर, हारुण शिकलगार यांच्या विजयात त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. लोकसभा, विधानसभा, तसेच महापालिका निवडणुकीत पक्षाचे काम केले होते. त्यामुळे त्यांनी स्वीकृतसाठी आपणाला संधी मिळावी, असे साकडे मंत्री कदम यांना घातले. लवकरच ते जयश्री पाटील यांचीही ते भेट घेणार आहे.

loading image
go to top