सांगली:महामार्ग भरावामुळे महापुराचा धोका वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 पुलांचे भराव काढले पाहिजेत,

सांगली:महामार्ग भरावामुळे महापुराचा धोका वाढला

सांगली: कृष्णा आणि वारणा नदीच्या महापूर काळात महामार्गासह अनेक रस्त्यांचे भराव कारणीभूत ठरले होते. सांगलीलगतचा बायपास; तसेच अंकली व धामणीजवळ रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या भरावाचा फटका गतवर्षीच्या महापुरावेळी बसला होता.

त्यानंतर हे काम करताना जागोजागी पाणी वाहून जाण्यासाठी कप्पे (बॉक्स) सोडावेत, अशी मागणी झाली होती. पालकमंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तशी सूचनाही केली होती. याबाबत ग्रामस्थांनी आंदोलनेही केली होती; मात्र आता महामार्गाचे काम पूर्ण झाले तरी याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महापूर आलाच तर शामरावनगर ते विश्रामबाग या शहराच्या भागात महापुराच्या पाण्याची पातळी नेहमीपेक्षा वाढलेली असेल.

सन २०१९ आणि २०२१ मध्ये कृष्णा-वारणा नद्यांना आलेल्या महाप्रलयकारी महापुराची कारणे शोधताना नदीच्या मार्गातील अडथळे समोर आले होते. ते दूर केले पाहिजेत, पुलांचे भराव काढले पाहिजेत, अशा सूचना तज्ज्ञांनी केल्या होत्या.

रस्ते महामार्गाचे भराव टाकताना महापूरकाळातील बदलणाऱ्या नदीप्रवाहांचा विचार केला पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी नोंदवले होते. तेव्हा रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे भव्य-दिव्य काम महापुराचे संकट वाढवणारे ठरल्याचे दिसून आले होते. महापूरकाळात पाण्याचा प्रवाह आयर्विन पूल ते हरिपूर रस्त्यावरील लिंगायत स्मशानभूमी परिसरातून सांगली शहरात शिरतो; किंबहुना पाणीपातळी पन्नास फुटांवर गेल्यानंतर कृष्णा नदीचा महापूरकाळातील सत्तर टक्के प्रवाह या भागातून गावभागालगतच्या सिद्धार्थ परिसर, नांद्रेकर प्लॉट, शामरावनगर, अंकली रस्ता यामार्गे वाहतो. हे पाणी पुढे धामणी-अंकली हद्दीतून जवळपाच पाच ओढ्यांमधून कृष्णा नदीला अंकली ते बामणोली या नदीप्रवाहाच्या टप्प्यात मिसळते. नदीचे बदलणारे हे प्रवाह महामार्गाची कामे करताना अजिबात विचारात घेतले गेलेले नाहीत. आता महामार्गरुपी घातलेल्या बंधाऱ्यामुळे महापूरकाळातील हे सर्व पाणी तुंबणार आहे. ओघानेच ते मागे फुगत...पसरत जाऊन सांगली बस स्थानक, शामरावनगर ते विश्रामबागपर्यंत पसरू शकते.

फक्त चर्चाच

गतवर्षी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाल्यानंतर पालकमंत्री जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांनी धामणीपासून पुढे महामार्गाला कप्पे करावेत, अशा सूचना दिल्या होत्या. धामणीचे नेते विठ्ठल पाटील यांनी नदीकाठालगतच्या गावांच्या बैठक घेऊन अंकली फाट्यावर आंदोलन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले. महामार्गाच्या बाजूला बंदिस्त गटाराचे काम सुरू आहे; मात्र महाप्रचंड लोंढ्यापुढे या छोट्या गटारांचा काहीही उपयोग होणार नाही. एकूणच शामरावनगर-विश्रामबाग ते धामणी या साऱ्या टापूत महापूरकाळात किमान चार फुटांनी पाणी पातळी वाढलेली असेल.

असे कप्पे (बॉक्स) करावेत, यासाठी मिरजेतील गणेशनगरजवळ आम्ही काम बंद पाडले. तेथे बोगदा पाडून घेतला आहे. पालकमंत्र्यांनी याबाबत पाठपुरावा करणे गरजेचे होते. महापूरकाळात आता दुष्परिणाम दिसतील. तेव्हा आम्ही रस्ता बंद पाडू, त्याची जबाबदारी जयंत पाटील यांची असेल.

- राजू शेट्टी, माजी खासदार

सांगली शहराचा पुराचा धोका कमी व्हावा, यासाठी समितीने अनेक उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यापैकी महामार्गाला मिरज ते अंकली या अंतरात ठिकठिकाणी महापूरकाळातील; तसेच एरव्हीचे नैसर्गिक ओढे-नाले विचारात घेऊन पुरेसे आऊटलेट ठेवावेत, अशी सूचना आम्ही केली होती. यासाठी आमचा आजही पाठपुरावा सुरूच आहे.

- विजयकुमार दिवाण,

- प्रभाकर केंगार

सदस्य, महापूर नियंत्रण कृती समिती

Web Title: Sangli Highways Risk Floods Increased Filling

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top