
'जे 60 महिन्यांत नाही झालं, ते 6 महिन्यांत करून दाखवलं...'
इस्लामपूर : ‘साठ महिन्यात नाही झाले ते अवघ्या सहा महिन्यात केलं,’ अशा आशयाचे फलक इस्लामपुरात झळकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे हे फलक शहरात चर्चेचा विषय ठरत आहेत. प्रत्येक प्रभागात ज्या-ज्या ठिकाणी जी-जी कामे केली, त्यांच्या उल्लेखासह आणि माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या फोटोसह हे फलक झळकले आहेत.
राज्यातील नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. ओबीसी आरक्षणाच्या कारणास्तव स्थगितही झाली. आता जुने आरक्षण नियमित करत न्यायालयाने पंधरा दिवसांत निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे. डिसेंबरमध्ये इस्लामपूर नगरपालिकेच्या सदस्यांचा कार्यकाल संपला आहे. सध्या नगरपालिकेचे कामकाज प्रशासकाच्या माध्यमातून सुरू आहे.
हेही वाचा: Raghunath Kuchik : 'भाजपच दलालीचं षडयंत्र, निवडणुका केंद्रस्थानी ठेवून सेनेला संपवण्याचा घाट घातलाय'
येत्या काही दिवसांत निवडणूक होईल. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला गेल्याचा प्रचार केला जात आहे. गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात नगरपालिका सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असले तरी नगराध्यक्ष मात्र विरोधी विकास आघाडीचा होता.
गेल्या पाच वर्षांत त्यांनी कोणताच विकास केला नाही, पूर्वी आम्ही मंजूर केलेल्या योजनेच्या माध्यमातून विकास केला, असे भासवले जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यात आता राष्ट्रवादीने इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज होताना वातावरणनिर्मिती करण्यासाठी शहराच्या विविध प्रभागांमध्ये डिजिटल्स लावली आहेत. शहरात विकासकामांबाबतची चर्चा डिजिटल फलकावर येऊ लागली आहे.
नागरिकांशी संवाद सुरू
गेल्या चार दिवसांत खुद्द जयंत पाटील यांनी स्वतः प्रभागांमध्ये बैठका घेत नागरिकांशी संवाद सुरू केला आहे. यातही विकास आघाडीने गेल्या पाच वर्षांत शहराचे नुकसान केल्याचा आरोप केला आहे. पदाधिकाऱ्यांनीही थेट नगराध्यक्ष आणि आघाडीवर निशाणा साधला आहे. इस्लामपूर शहरात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आणण्यासाठी माजी मंत्री जयंत पाटील, प्रतीक पाटील यांनी यंत्रणा गतिमान केली आहे.
हेही वाचा: कट्टर शिवसैनिकांनाही आमिषे; शिंदे गटातील कोकणातील आमदारांसह एजंटांचे फोन
Web Title: Sangli Islampur Ncp Show Banner Within 6 Months Photo Of Jayant Patil Election 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..