सांगली बँक मतदानाचा टक्का घटला : 18 जागांसाठी 85.31 टक्केच मतदान ; Sangli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Bank Election

सांगली बँक मतदानाचा टक्का घटला : 18 जागांसाठी 85.31 टक्केच मतदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली  : जिल्हा बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरसीने मतदान होईल अशी शक्यता असताना मागील निवडणुकीपेक्षा टक्का घटला. बॅंकेच्या 21 पैकी 18 जागांसाठी लागलेल्या निवडणुकीत 85.31 टक्के मतदान झाले. सांगलीतील (Sangli) केंद्रावर सर्वात कमी 53 टक्के इतके मतदान झाले. तर आटपाडीतील केंद्रावर सर्वाधिक 99.38 टक्के मतदान झाले.

जिल्हा बॅंकेच्या मागील निवडणुकीत 99 टक्के मतदान झाले होते. यंदाही तेवढेच मतदान होईल अशी अपेक्षा होती. परंतू प्रत्यक्षात तशी परिस्थिती दिसून आली नाही. जिल्ह्यातील बारा ठिकाणी सकाळी ८ पासून मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. बँकेच्या निवडणुकीसाठी सकाळच्या टप्प्यात चुरसीने मतदान झाले. दुपारी १२ पर्यंत २५७३ पैकी १४३६ मतदारांनी मतदान केले होते. दुपारी १२ वाजताच ५६ टक्के मतदान झाल्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल असे चित्र होते. दुपारीचार वाजता 85 टक्के मतदान झाल्यामुळे 90 टक्केहून अधिक मतदान होईल अशी शक्यता होती. प्रत्यक्षात सांगलीतील केंद्रावर उमेदवारांची निराशा झाली. नेते व उमेदवार तळ ठोकून असताना या केंद्रावर 53 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात एकुण 85.31 टक्के मतदान झाले.

हेही वाचा: जयंत पाटील 'ऑन अॅक्टिव्ह मोड'; सांगलीत बॅंक मतदानाला सुरुवात

दरम्यान, आज नेते मंडळींसह उमेदवार प्रत्येक केंद्रावर भेटी देऊन मतदानाची आकडेवारी घेत होते. जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी तीन जागावर महाआघाडीचे आमदार अनिल बाबर,आमदार मानसिंगराव नाईक, महेंद्र लाड हे तीन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरीत १८ जागांसाठी महाआघाडीचे सहकार विकास पॅनेल आणि भाजपचे शेतकरी विकास पॅनेलमध्ये लढत लागली आहे. सहकार पॅनेलने १८ तर भाजपच्या शेतकरी पॅनेलने १६ उमेदवार रिंगणात उभे केले होते. तसेच १२ अपक्षही रिंगणात आहेत.

जिल्हा बँकेची निवडणूक प्रथमच पक्षीय पातळीवर होत आहे. त्यामुळे महाआघाडी आणि भाजप उमेदवारांमध्ये चुरस आहे. सोसायटी गटातील जत, आटपाडी, तासगाव आणि अन्य गटात चुरस निर्माण झाली आहे. क्रॉस व्होटींगची भिती असल्यामुळे उमेदवार दक्ष होते. मंगळवारी (23) मिरजेत शेतकरी भवनमध्ये मतमोजणी होणार आहे.

तालुकानिहाय मतदान व कंसात टक्केवारी अशी :

आटपाडी- 159 (99.38), कवठेमहांकाळ- 159 (92.44), खानापूर -121 (91.67), जत-162 (85.71), तासगाव -184 (78.63), मिरज - 132(79.52), वाळवा- 290(97.64), वाळवा- 215 (91.49), शिराळा-208 (98.18), पलूस-184 (97.35), कडेगाव-149 (98.68), सांगली -232 (53.21)

loading image
go to top