
सांगली : ३७ तोळ्यांचे दागिने पळविले
सांगली : विजयनगर येथील हॉटेल सेलिब्रेशनच्या दारात पार्किंग केलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्याने १४ लाख ८१ हजार ५०० रुपयांचे ३७ तोळे दागिने असलेली पर्स लांबवली. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी सिद्धेश विजय माने (वय २७, बी वॉर्ड, ताराराणी कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सिद्धेश माने हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या पत्नीचा मावसभाऊ संदीप जाधव याचे मंगळवारी बेडग (ता. मिरज) येथे लग्न होते. त्यामुळे माने दाम्पत्य लग्नासाठी आले होते. दुपारी लग्नसमारंभ आटोपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास श्री. माने हे मिरज एमआयडीसी रस्त्यावरील सासूरवाडीत आले. विश्रांती घेतल्यानंतर रात्री पावणेदहा वाजता श्री. माने, पत्नी, सासरे, सासू, मेहुणा, मेहुणी असे सर्वजण विजयनगर येथील सेलिब्रेशन हॉटेलमध्ये जेवणासाठी आले.
श्री. माने यांच्या पत्नीचे दागिने एका पर्समध्ये ठेवले होते. हॉटेलमध्ये जेवणासाठी जाताना पर्स मोटारमध्ये (एमएच ०९ ईयू ८३२५) चालकाच्या सीटवर ठेवून दरवाजा लॉक केला. श्री. माने यांनी मोटार हॉटेलच्या डाव्या बाजूला मोकळ्या जागेत लावली होती. सर्वजण हॉटेलमध्ये गेल्यानंतर चोरट्याने दरवाजाची काच फोडून आतील पर्स पळवली. दरम्यान, जेवण आटोपल्यानंतर रात्री सव्वाअकराच्या सुमारास श्री. माने हे मोटारीजवळ आले, तेव्हा उजव्या बाजूची काच फोडल्याचे दिसले. तत्काळ मोटारीचा दरवाजा उघडला असता आतील सीटवर ठेवलेली पर्स पळवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. तब्बल ३७ तोळ्यांचे दागिने चोरट्याने पळवल्याचे समजताच परिसरातील सर्वांनाच आश्चर्य वाटले. श्री. माने यांनी विश्रामबाग पोलिसांना माहिती कळवली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. आज अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागवले असून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
चोरीला गेलेला ऐवज...
दहा तोळ्यांचे गंठण, पाच तोळ्यांचा नेकलेस, दहा तोळ्यांचे दोन तोडे, दहा तोळ्यांच्या चार बांगड्या, दोन तोळ्यांची कर्णफुले, चांदीच्या खड्याचे मंगळसूत्र असा १४ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता.
Web Title: Sangli Jewelery Stolen Weights
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..