Sangli : पतीच्या निधनानंतर जपली शेतीनिष्ठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

Sangli : पतीच्या निधनानंतर जपली शेतीनिष्ठा

नवेखेड : भवानीनगर (ता. वाळवा) येथील श्रीमती अनुपमा प्रकाश कुलकर्णी यांनी पतीच्या निधनानंतर १८ एकर शेतीचा डोलारा सक्षमपणे सांभाळलाय. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अनुपमा यांचा विवाह प्रकाश कुलकर्णी यांच्याशी झाला. एक मुलगा दहावीत, तर दुसरा सातवीत असताना पती देवाघरी गेले. कुटुंबाचे शेती हेच उपजीविकेचे मुख्य साधन असताना आलेल्या वैधव्यामुळे त्या कोलमडून पडल्या.

माहेरी शेतीची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या अनुपमा यांच्या सासरी शेती, गोठा असा व्याप होता. पती शेतकरी मात्र, अनुपमा यांना शेतीचा कोणताही अनुभव नव्हता. पतीच्या निधनानंतर मुलांचे शिक्षण, भवितव्य काय, असा विचार करून कणखर बनत दुःख बाजूला ठेवले. शेतीचा डोलारा आपल्या खांद्यावर घेत संघर्षमय वाटचाल आरंभली. सुरुवातीला उसाचे उत्पादन सरासरी एकरी ३५ टन निघायचे. पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ऊस शेती व्यवस्थापन शिबिरात सहभागी होत नवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. पट्टा पद्धतीसह जोडओळ प्रयोगांचा अवलंब केला. आडसालीचे उत्पादन एकरी ८० ते ९० टनापर्यंत, तर खोडव्याचे ६५ टनांवर नेलेय.

केळी, टोमॅटो, मिरची, पपई या पिकांची लागवड केली. या नगदी पिकांमुळे चार पैसे राहू लागले. चार हजार फूट पाईपलाईन करून संपूर्ण क्षेत्र बागायत करून ठिबक सिंचन केले. रासायनिक शेतीला शेणस्लरीचा जोड देत उत्पादन खर्च कमी केला. मध्यंतरी त्यांनी दोन एकर क्षेत्रावर नवा प्रयोग म्हणून हमीभावाने भेंडीची यशस्वी करार शेती केली.

आर्थिक घडी बसवताना अजिंक्य व अमृत या दोन्ही मुलांना अभियंता बनवले. कृषी संस्कृती जपणाऱ्या या दोघांनीही आईची शिकवण प्रत्यक्षात आणून उच्च शिक्षणानंतर बाहेर नोकरी न करता भूमातेची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी केलेले अनेक प्रयोग यशस्वी झाले आहेत.

महिलांनी सबला झाल्याशिवाय संकटावर मात करता येत नाही. कोणतीही वेळ सांगून येत नसल्याने आपत्ती आली तरी खचून न जाता त्यातून उभारी घेणे गरजेचे आहे. कष्टाला सातत्य व नवनिर्माणाची जोड दिल्यास काळी आई भरभरून देतेच. पडत्या काळात शेतीने खूप दिलेय. कृषी संस्कृती जपण्यासाठी महिलांचाही पुढाकार तितकाच महत्त्वाचा आहे.

- श्रीमती अनुपमा कुलकर्णी, भवानीनगर (ता. वाळवा)_