esakal | गोवा-कोल्हापुरात रंगले सांगली महापौर-उपमहापौर निवडणुकीचे नाट्य
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli Mayor-Deputy Mayor Election Drama scripted in Goa-Kolhapur

सांगली भाजपचा महापालिकेतील अडीच वर्षांचा सत्ताकाळ संपल्यानंतर इथली सत्ता उलथवण्याचे डावपेचांना बळ मिळाले. त्यासाठी गेले महिनाभर पडद्याआड मोठ्या कसरती सुरू होत्या. त्याचे दृश्‍यरुप आज दिसले इतकेच.

गोवा-कोल्हापुरात रंगले सांगली महापौर-उपमहापौर निवडणुकीचे नाट्य

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली भाजपचा महापालिकेतील अडीच वर्षांचा सत्ताकाळ संपल्यानंतर इथली सत्ता उलथवण्याचे डावपेचांना बळ मिळाले. ते वर्षभरापूर्वीच्या राज्यातील सत्तांतरामुळे. आज झालेल्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने 39-36 असा भाजपचा पराभव करीत महत्त्वाचे सत्ताकेंद्र ताब्यात घेतले आहे. मात्र त्यासाठी गेले महिनाभर पडद्याआड मोठ्या कसरती सुरू होत्या. त्याचे दृश्‍यरुप आज दिसले इतकेच. 

2014 नंतर भाजपच्या देशव्यापी सुरू झालेल्या विस्तार मोहिमेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अभेद्य गड बघता बघता जमीनदोस्त झाले होते. सांगली जिल्हाही त्याला अपवाद राहिला नाही. मागील महिनाभर महापौर निवडणुकीचे नगारे वाजत होते. स्थायी समिती सभापती निवडणुकीवेळी भाजपचे पांडुरंग कोरे यांनी बाजी मारल्याने भाजपने पहिला डाव जिंकला होता. मात्र जयंत पाटील यांचे लक्ष्य महापौरपदच होते. त्यासाठी पद्धतशीर फिल्डिंग लावण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी "जनतेने भाजपला पाच वर्षांसाठी महापालिकेत संधी दिली आहे. आम्हाला अशा अर्ध्या सत्तेत स्वारस्य नाही', असे विधान करीत भाजपला कात्रजचा घाट दाखवला. मात्र शेवटच्या टप्प्यात या करेक्‍ट कार्यक्रमाची भाजप नेत्यांनाही पुरती जाणीव झाली होती, मात्र तोवर उशीर झाला होता. 

भाजपने फक्त 26 सदस्यांना गोवा सहलीवर नेले. त्यातूनच त्यांची तयारी किती कच्ची होती याची प्रचिती आली होती. इकडे दोन्ही कॉंग्रेसनेही दोन दिवसांपूर्वी सर्व सदस्यांना सहलीवर नेताना काल कोल्हापुरातील एका हॉटेलवर आणून ठेवले. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी नेतेमंडळी 32 सदस्यांसह कोल्हापुरात दाखल झाले होते. आज सकाळी इद्रिस नायकवडी गटाचे दोन सदस्य कोल्हापुरात दाखल झाले. कॉंग्रेस नेत्या जयश्री पाटील व विशाल पाटील देखील कोल्हापुरात आले होते. म्हणजे आघाडीचे सर्व 34 सदस्य एकत्र आले.

बहुतमासाठी तीन सदस्यांची गरज होती. भाजप गोटातील एकूण सात सदस्य गायब झाले होते. त्यापैकी विजय घाडगे, स्नेहल सावंत, महेंद्र सावंत या तीन सदस्यांनी भाजपला ठेंगा दाखवल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. प्रत्यक्षात मतदानावेळी उर्वरित सदस्यांपैकी नसीमा नाईक आणि अपर्णा कदम यांनी विरोधी मतदान केले; तर मिरजेतील सदस्य व उपमहापौर आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे यांनी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. त्यामुळे भाजपला चिन्हावरील चार आणि सहयोगी एक अशा पाच सदस्यांनी दणका दिला. गैरहजर सदस्य रुग्णालयात दाखल असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यामुळे भाजपचा पराभवाची पूर्ण जुळणी झाली होती. 

मिरज पंचायत समितीत ट्रेलर 
भाजपअंतर्गत नाराजीची पहिली तोफ विद्यमान उपमहापौर आनंदा देवमाने यांनीच डागली होती. स्थायी समिती सभापती निवडणुकीवेळीही त्यांनी तोच राग आळवला होता. महापौर-उपमहापौर उमेदवार निवडीवेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्याचे पडसाद उमटणार याची चर्चा सुरू असताना गेल्या आठवड्यात मिरजेत सभापती, उपसभापती निवडणुकीत कॉंग्रेसचे अनिल आमटवणे विजयी झाले. इथे भाजपचे दोन सदस्य फोडत कॉंग्रेसने उपसभापतीपद पटकावले होते. एका अर्थाने तो महापालिकेतील सिनेमाचा तो ट्रेलरच होता. 

ते शेवटपर्यंत नॉटरिचेबलच 
भाजपने महापौरपदी धीरज सूर्यवंशी यांना, तर उपमहापौरपदी गजानन मगदूम यांना उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपमधील 11 नगरसेवक नॉट रिचेबल झाले. त्यांना पुन्हा तंबूत आणू शकू असा आशावाद भाजप नेते व्यक्त करीत होते, तरी प्रत्यक्षात ते किती अवघड आहे याची त्यांना जाणीव होतीच. हे सदस्य नॉटरिचेबल करून राष्ट्रवादीने केवळ भाजपवरच नव्हे, तर कॉंग्रेसवरही कडी केली होती. कारण महापौरपद जिंकण्यासाठी आवश्‍यक ती अतिरिक्त सदस्यांची तजवीज करण्यात राष्ट्रवादीने आघाडी घेतली होती. 

ते सदस्य राष्ट्रवादीच्या रिमोटमध्येच 
भाजपच्या अपर्णा कदम, नसीमा नाईक, स्नेहल सावंत आणि महेंद्र सावंत हे चार सदस्य पहिल्या दिवसापासून नॉटरिचेबल झाल्या. त्यापैकी स्नेहल सावंत आणि महेंद्र सावंत वगळता अन्य सदस्य परत आणण्याचे अटोकाट प्रयत्न भाजपकडून झाले. विजय घाडगे यांनी आपण पहिल्या दिवशीच धीरज सूर्यवंशी यांना मतदान करणार नाही, असे भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला सांगितल्याची चर्चा होती. त्यातून भाजपच्या हातून दोर निसटत असल्याचा सूर चार दिवस उमटत होता. 

संपादन : युवराज यादव