esakal | सांगली महापौर निवड : चंद्रकांतदादांची आज सांगलीत खलबते
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli mayor election: Chandrakant Patil will discuss in Sangli today

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रविवारी सांगलीत जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर सांगलीच्या नव्या महापौरपदाबाबतची खलबते करणार आहेत.

सांगली महापौर निवड : चंद्रकांतदादांची आज सांगलीत खलबते

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रविवारी सांगलीत जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर सांगलीच्या नव्या महापौरपदाबाबतची खलबते करणार आहेत. या बैठकीत झेडपीच्या नव्या अध्यक्ष निवडीबाबतही चर्चा होऊ शकते. मात्र आधी लगीन महापौरपदाचे हाच उद्याच्या बैठकीचा मुख्य अजेंडा असेल. सर्वांचेच समाधान करण्यासाठी उर्वरित कालावधीसाठी तीन महापौर द्यावेत असा पक्षांतर्गत आग्रह असल्याचे समजते. महापौर पदासाठी गुरुवारपर्यंत (ता.18) अर्ज दाखल करता येणार आहेत. 

महापालिकेत भाजपच्या स्वबळावरीले सत्तेला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्यात सत्तांतर झाल्याने इथल्या सत्तेपुढेही आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे भाजपला जपून पावले टाकावी लागणार आहेत. पहिल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळाबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोत्थानमधून जाहीर केलेला शंभर कोटींचा निधी पुर्णाशांने अद्याप मिळालेला नाही.

महापूर, कोरोनाच्या संकटाने पालिकेचा आर्थिक गाडा रुतला आहे. आता ज्यांना लाडावून सांगलीत आणले ते प्रशासकीय अधिकारीही आपले मुळ गुण दाखवत आहेत. त्यामुळे सत्ताधारीच अस्वस्थ आणि राष्ट्रवादीवाले जोमात आहेत. राज्यातील सत्ताबदलामुळे आता सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांच्या फायलीच अधिक गतीने हलत आहेत. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर महापौरपदाची खांदेपालट मोठे आव्हान असेल. त्यातच महापौरपद खुले झाल्याने इच्छुकांची रांग वाढली आहे. त्यावर तोडगा म्हणून कोल्हापूर पॅटर्नसारखा अनेक महापौरांचा प्रयोग केला जावू शकतो, अशी शक्‍यता आहे. 

मिरजेचे कारभारी सुरेश आवटी यांचे पुत्र निरंजनला महापौरपदी बसवण्याचे स्वप्न आहे. तेच सांगलीवाडीचे माजी आमदार दिनकर पाटील यांच्या पुत्र अजिंक्‍यबाबत असेल. दोघांनीही आधीपासूनच फिल्डिंग लावली आहे.याशिवाय गटनेतेपदाचा राजीनामा दिलेले युवराज बावडेकर, उपमहापौरपद भुषवलेले धीरज सूर्यवंशी आहेतच. धीरज यांची आमदार सुधीर गाडगीळ यांच्यामार्फत चंद्रकांतदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी भलतीच जवळीक वाढवली आहे. मिरजेचे गणेश माळी यांनीही महापौर पदावर सांगितला असून, नेत्यांकडे उमेदवारी मागितली आहे.

महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांची मनिषाही उघड आहे. मनसेतून भाजपवासी झालेले आमदार नितिन शिंदे यांनी भाजप नेत्यांना "तुमच्या विचारांचा महापौर करायचा असेल तर आमचाच पर्याय असेल.' असे सांगितले आहे. कुपवाडकर मंडळींचा नेहमीप्रमाणे अन्यायाचा पाढा आहेच. 

स्थायी सभापती निवडीवेळी चंद्रकांतदादांनी सदस्यांना जाहीर कानपिचक्‍या देत बहुमत असतानाही धाकधूक का असा थेट सवाल केला होता. त्याचवेळी त्यांनी पुढचा महापौर "ब्रॅंडेड' भाजपचाच असेल असे जाहीर केले होते. विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून "करेक्‍ट' कार्यक्रमाची धाकधूक कायम आहे. तथापि भाजपमधील एखाद दुसरे नावे पुढे आल्यास नाव दोन्ही कॉंग्रेसमधून फारशी हालचाल होणार नाही कारण तत्कालीन "जेजेपी'चे महाआघाडीची जुने स्नेहबंध कायम आहेत. तसे झाल्यास जयंत पाटील यांती तलवार म्यान होऊ शकते. 

"जेजेपी' की "भाजप'? 
पालकमंत्री जयंत पाटील यांनी महापालिकेत सत्तांतर करण्यात रस नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र त्यांच्या मनातील भाजपने उमेदवार न दिल्यास ते ऐनवेळी मोर्चेबांधणी करू शकतात. मात्र ते स्वकीयाऐवजी भाजप बंडखोराला पसंती द्यायचा विचार करु शकतात. सध्या महापालिकेत राष्ट्रवादीची प्रशासनाच्या माध्यमातून अदृष्य सत्ता आहे. कामे होत असतील तर सत्ता ताब्यात पुन्हा बदनामी कशाला असा राष्ट्रवादीतील अंतर्गत सूर आहे. महाआघाडीच्या काळात जयंत जनता पार्टीच्या रुपाने काम करणाऱ्या चेहऱ्यांना राष्ट्रवादीची पसंती असेल.

संपादन : युवराज यादव