सांगली महापौर निवड : कॉंग्रेसचे 9 नगरसेवक "नॉट रिचेबल'

बलराज पवार
Sunday, 21 February 2021

सांगली महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप सत्ता वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना आता नवीन ट्‌विस्ट तयार झाला आहे.

सांगली : महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप सत्ता वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना आता नवीन ट्‌विस्ट तयार झाला आहे. कॉंग्रेसचे नऊ सदस्य "नॉट रिचेबल' झाले आहेत. कॉंग्रेसने महापौरपदावर दावा सांगितला आहे.

विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनाच महापौरपदाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी कॉंग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीकडे केली आहे. याचबरोबर दोन्ही कॉंग्रेसच्या समन्वयाने होईल तो निर्णय अंतिम असेल, अशी भूमिका ठेवत महापालिकेत सत्ता परिवर्तन होईलच, असाही दावा कॉंग्रेसने केला आहे. 

कॉंग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार आणि विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांच्यासह काही नगरसेवकांनी आज पलूस येथे कॉंग्रेसचे नेते, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची भेट घेऊन चर्चा केली. महापालिकेत विरोधी कॉंग्रेस आघाडीमध्ये कॉंग्रेस मोठा पक्ष आहे. त्यामुळे कॉंग्रेसला महापौरपदाची उमेदवारी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, बहुमताचा प्रश्‍न उपस्थित केल्यावर नगरसेवकांनी नेत्यांना बहुमत होईल अशी ग्वाही दिली. 

डॉ. कदम यांनी नगरसेवकांचे म्हणणे ऐकल्यानंतर श्रीमती जयश्री पाटील, विशाल पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या नेत्यांनीही महापौरपद लढवण्याची मागणी राष्ट्रवादीकडे करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार उत्तम साखळकर यांना महापौरपदाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी कॉंग्रेस नेते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे करणार आहेत.

याबाबत दोन दिवसांत दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे. राष्ट्रवादीनेही महापौरपदावर दावा सांगितला असल्याने कॉंग्रेस आघाडीत महापौरपदावरून रस्सीखेच कायम आहे; मात्र नेत्यांचा निर्णय अंतिम असेल, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली आहे. 

एकतर्फी निर्णय नको 
दरम्यान, कॉंग्रेसचे नऊ नगरसेवक नॉट रिचेबल झाले आहेत. ते कोकणात सहलीवर गेल्याचे समजते. महापौर उमेदवाराबाबत राष्ट्रवादीने एकतर्फी निर्णय घेऊ नये, अशी या नगरसेवकांची मागणी आहे. उत्तम साखळकर यांना उमेदवारी द्यावी किंवा राष्ट्रवादीतून मैनुद्दीन बागवान यांना संधी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच सभागृह नेतेपद तसेच स्थायी समितीमध्ये जादा सदस्यत्व मिळावे, अशीही या नगरसेवकांची मागणी असल्याचे समजते. 

सव्वा वर्षाच्या संधीचा पर्याय 
राष्ट्रवादी - कॉंग्रेस आघाडीत महापौरपदासाठी प्रत्येकी सव्वा वर्षाचा पर्यायही काही नगरसेवकांनी ठेवला आहे. त्याला मान्यता मिळण्याची शक्‍यता आहे. यामध्ये प्रथम राष्ट्रवादीला व नंतर कॉंग्रेसला संधी मिळावी, असा पर्याय सुचवला आहे. कॉंग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी काही राष्ट्रवादी नगरसेवकांशीही चर्चा केली. एकसंधपणे आघाडीमार्फत लढण्याची सूचना त्यांनी दिल्याचे समजते. बैठका व चर्चांबाबत दोन्ही पक्षांच्या स्तरावर कमालीची गोपनीयता बाळगली आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli mayoral election: 9 Congress corporators "not reachable"