सांगली महापौर निवड : सत्ताबचावासाठी भाजपचे निकराचे प्रयत्न

बलराज पवार
Sunday, 21 February 2021

सांगली महापालिकेची सत्ता वाचवण्यासाठी भाजपचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत. "नॉट रिचेबल' सदस्यांचा शोधासाठी भाजपचे नेते, कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

सांगली : महापालिकेची सत्ता वाचवण्यासाठी भाजपचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत. "नॉट रिचेबल' सदस्यांचा शोधासाठी भाजपचे नेते, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यापैकी दोन सदस्य पुन्हा भाजपच्या गोटात आज सामील झाले. सहयोगी सदस्य असलेला एक अपक्ष अजूनही गायब आहेत. शिर्ष नेतृत्वाने शहरात अजूनही थांबून असलेल्या उर्वरित नगरसेवकांना गोव्याला जाण्याची सूचना केल्याने आज आठ-नऊ जण रवाना झाले. सध्या गोव्यात भाजपचे 27 नगरसेवक एकत्र असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी महापौर निवडीत लक्ष घातल्याचे समजते. बहुमताने आलेली सत्ता गमावू नये, यासाठी नेत्यांनी सर्व प्रयत्न करण्याची सूचना केली आहे. नाराज सदस्यांना परत आणण्यासाठी कोअर कमिटीच्या नेत्यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. "नॉट रिचेबल' सदस्यांमध्ये मिरजेचे तीन, सांगलीतील तीन, सांगलीवाडीतील एक; तसेच कुपवाडमधील एक सदस्य असल्याची चर्चा आहे. भाजप नेत्यांनीही याबाबत मौन पाळून गेलेले सदस्य परत येतील, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. दोन दिवसांत पुन्हा सगळे सदस्य आमच्यासोबत असतील, असा दावा केला आहे. 

महापौर निवडीसाठी येत्या 23 रोजी ऑनलाईन विशेष महासभा होणार आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधी कॉंग्रेस आघाडी बहुमताची 39 मॅजिक फिगर गाठण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भाजपकडे 41 नगरसेवक आणि दोन सहयोगी अशा 43 सदस्यांचे बहुमत आहे. पांगलेल्यांना एकत्र आणण्याच्या भाजपच्या प्रयत्नांचे फलित म्हणजे दोन सदस्य पुन्हा गोटात परतले आहेत, मात्र आणखी एक सदस्य कालपासून संपर्काबाहेर गेला आहे. 

कोअर नेत्यांवर जबाबदारी 
भाजपच्या कोअर कमिटीचे नेते सुरेश आवटी, माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार यांनी यंत्रणा वापरून गायब सदस्यांचा शोध घेणे सुरूच ठेवले आहेत. सदस्यांच्या कुटुंबीयांपासून नातेवाईकांपर्यंत चौकशी करून त्यांचा ठावठिकाणा शोधला जात आहे. 

दोन सदस्यांचा नाद सोडला 
संपर्काबाहेर गेलेल्या दोन सदस्यांचा भाजपने नाद सोडल्याचे समजते. हे सदस्य विरोधी महापौर उमेदवाराला थेट मतदान करतील, अशी शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांना वजा केले असून, उर्वरित सदस्य दोन दिवसांत परततील, असा विश्‍वास भाजप गोटातून व्यक्त झाला. 

भाजपचा "व्हीप' 
भाजपने वृत्तपत्रांतून जाहिरात प्रसिद्ध करून आपल्या सर्व नगरसेवकांच्या नावांसह व्हिप बजावला आहे. याशिवाय "नॉट रिचेबल' नगरसेवकांच्या घराच्या दरवाजावरही व्हीपचे पत्र चिकटवल्याचे गटनेते सिंहासने यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने मात्र व्हीप बजावलेला नाही. त्यामुळे सध्याच्या सुगीच्या दिवसात त्यांना अधिक मोकळे रान आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli mayoral election: BJP's concerted efforts to save power