सांगली-मिरज बस थंड; रिक्षावाल्यांकडून लूट

अजित झळके
Tuesday, 29 September 2020

सांगली-मिरज या मुख्य मार्गावरील बससेवा रडत खडतच सुरू आहे. त्याचा गैरफायदा या मार्गावरील रिक्षावाल्यांनी घ्यायला सुरवात केली आहे.

सांगली ः सांगली-मिरज या मुख्य मार्गावरील बससेवा रडत खडतच सुरू आहे. प्रवाशांचे सार्वजनिक वाहनांतून प्रवास करण्याचे धाडस होत नाही, या कारणास्तव बस फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. त्याचा गैरफायदा या मार्गावरील रिक्षावाल्यांनी घ्यायला सुरवात केली आहे. रिक्षा प्रवाशांकडून लूटच सुरू आहे. ती थांबवण्यासाठी या मार्गावर बसच्या फेऱ्या नियमित करण्याची गरज आहे. 

कोरोनाच्या संकटकाळात मार्चपासून एसटी बस बंद आहे. जुलैमध्ये एसटी सुरू झाली; मात्र ती सुरळीत झाली नाही. लोकच बाहेर पडत नसल्याने एसटीला प्रवासी कमी आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत हे वास्तव आहे; मात्र शहरांतर्गत व्यवहार आता बऱ्यापैकी पूर्ववत झाले आहेत.

शासकीय कार्यालये, खासगी कंपन्या सुरू आहेत. दोन्ही शहरांतील व्यवहारही नियमित झाला आहे. प्रवाशांची संख्या वाढली आहे. थांब्यावर रिक्षांना मागणीही वाढली आहे. अशावेळी रिक्षावाल्यांनी मनमानी दर आकारायला सुरवात केली आहे. एका रिक्षात दोनच लोकांना बसायला परवानगी आहे, अशा सबबीवर त्यांनी 50 रुपये आकारायला सुरवात केली आहे. वास्तविक रिक्षामधून चार किंवा त्याहून अधिक प्रवासी बसवून वाहतूक थांबलेली नाही. 

या स्थितीत शहरी बससेवा पूर्ण क्षमतेने पूर्ववत करण्याची गरज आहे. पहिले काही दिवस भारमान कमी असेल; मात्र बस येईल, याची हमी असेल तर प्रवासी रिक्षाला 50 रुपये देणार नाहीत, हे स्पष्ट आहे. सध्या सांगली आगारातून 6, तर मिरज आगारातून 5 बसद्वारे फेऱ्या सुरू आहेत. एकूण ये-जा अशा 40 फेऱ्या होत आहेत. एसटीचा सांगली स्थानक ते मिरज स्थानक हा तिकीट दर 25 रुपये इतका आहे. त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. फेऱ्यांत वाढ केली आणि सध्याच्या प्रवाशांचा वेळ अभ्यासून त्याचे नियोजन केल्यास या रस्त्यावरील रिक्षाकडून सुरू असलेली लूट कमी होणार आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli-Miraj bus running less trips; rickshaw drivers charging more