सांगली, मिरजेत रूग्णसंख्येचे अर्धशतक; 28 ठिकाणे केली बंदिस्त

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

हापालिका क्षेत्रात गेल्या दहा दिवसांत रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असून रुग्णसंख्येचे अर्धशतक पूर्ण झाले आहे.

सांगली : महापालिका क्षेत्रात गेल्या दहा दिवसांत रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असून रुग्णसंख्येचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. कुपवाड वगळता सांगली आणि मिरज शहरातील प्रमुख भागात रुग्ण आढळून आले आहेत. दोन शहरात 28 ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून तेथील लोकांच्या मदतीसाठी महापालिकेसह स्थानिक नगरसेवक आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, रुग्णांचा संख्या वाढत असून नागरीकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेले तीन महिने महापालिका क्षेत्रात संसर्ग रोखण्यात प्रशासनाला चांगलेच यश आले. त्यामुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या फारशी वेगाने वाढत नव्हती. मात्र, शहरात आठवड्यात रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आठवड्याभरात 28 ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात आलेत. ही संख्या वाढण्याचीच शक्‍यता आहे.

प्रशासनावर ताण वाढत आहे. अशा परिस्थितत कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची घर टू घर तपासणी करून त्यांना अत्यावश्‍यक सेवा देण्यासाठी पालिकेसह नगरसेवक आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. 
विजयनगर येथे पहिला रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने एक किलोमीटरचा कंटेन्मेंट झोन आणि चार किलोमीटरचा बफर झोन केला. तब्बल 28 दिवस नागरिकांची अडचण झाली. कंटेन्मेंट झोनमध्ये कुटुंबे मोठ्या संख्येने अडकून पडली. त्यांना अत्यावश्‍यक सेवा पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते. यातून धडा घेत कंटेन्मेंट झोनचा आकार आता शंभर ते दोनशे मीटर एवढाच केला आहे. त्यामुळेच सध्या शहरातील 28 कंटेन्मेंट झोन असतानाही प्रशासनाला खबरदारीच्या उपाय योजना राबवण्यात अडचणी येत नाहीत. 

शहरातील आठ दिवसांत खणभागातील शिकलगार गल्ली, गावभागातील शिकलगार गल्ली, स्वरुप टॉकीजजवळची गांधी वसाहत, शंभर फुटी रोडवरील एका हॉस्पिटलचे डॉक्‍टर आणि नंतर तेथील नर्स, प्रभाग अठरामधील हनुमान नगर, विठ्‌ठल नगर, कलानगर, वारणाली, खणभागातील नगारजे गल्ली, शामरावनगर, गणपती पेठेतील गुजर बोळ, कर्नाळ रोडचे दत्तनगर, कोल्हापूर रोड, मिरजेत ब्राह्मणपुरी, इस्त्राइलनगर, रेवणी गल्ली, सुंदरनगर, शांतीसागर कॉलनी, वाळवे गल्ली याठिकाणी कंटेन्मेंट करण्यात आले आहेत. 

नागरीकांनी खबरादीर बाळगावी

कंटेन्मेंट झोनमध्ये तातडीने घर टू घर सर्वे केला जात आहे. नागरिकांनी तपासणी करून त्यांना खबरदारी घेण्यासाठी सूचना केल्या जात आहेत. तसेच भागात अत्यावश्‍यक सुविधा देण्यासाठी महापालिका तत्पर आहे. संसर्गापासून बचावण्यासाठी नागरीकांनी खबरादीर बाळगावी.
- डॉ. रवींद्र ताटे, आरोग्याधिकारी, महापालिका 

स्वयंसेवकांची टीम सज्ज

आमच्या भागात सर्वाधिक असे 4 कंटेन्मेंट झोन आहेत. त्याठिकाणी नागरीकांना अत्यावश्‍यक सुविधा देण्यासाठी स्वयंसेवकांची टीम सज्ज केली आहे. तसेच भागातील प्रत्येक नागरीकांची आरोग्य तपासणी करून घेण्यात आली आहे. गरजू कुटुंबांना धान्य पुरवठाही करण्यात आला आहे. तसेच भगातील 52 हायरिस्कमधील लोकांना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच अत्तापर्यंत भागातील 72 लोकांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी चार जणांना लागण झाली आहे. भागात वेळच्यावेळी औषध फवारणीही सुरू आहे.
- अभिजीत भोसले, नगरसेवक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Sangli, Miraj half-century of patients; 28 places closed