esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

 सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी संजय मेंढे

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी संजय मेंढे

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड ( Sangli,Miraj,Kupwad) शहर महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी मिरजेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय मेंढे (Sanjay Mendhe) यांची अपेक्षेनुसार निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) यांनी आज महापौर दिग्विजय सूर्यवंशी (Digvijay Suryavanshi) यांच्याकडे सादर केले.

महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसचे नेते राज्यमंत्री विश्वजीत कदम, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, महापालिकेच्या नेत्या जयश्री पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी गेल्या सोमवारी संजय मेंढे यांचे नाव निश्चित केले होते. मात्र युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी त्या पदासाठी आग्रह धरला होता. त्याचबरोबर मिरजेच्या नगरसेविका वहिदा नायकवाडी यांनीही विरोधी पक्षनेतेपदासाठी नेत्यांकडे मागणी केली होती. त्यामुळे गेले आठ दिवस खलबते सुरू होती. मात्र नेत्यांनी आपल्या निर्णयात कोणताही बदल केला नाही.

दरम्यान, गेल्या शुक्रवारी उत्तम साखळकर यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा महापौरांकडे सादर केला होता. आज सकाळी दहाच्या सुमारास काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पाटील, उपमहापौर उमेश पाटील, माजी विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर, नूतन विरोधी पक्षनेते संजय मेंढे हे महापालिकेत दाखल झाले. शहर जिल्हाध्यक्ष पाटील यांनी नवीन गटनेता तसेच विरोधी पक्ष नेते पदी संजय मेंढे यांची निवड केल्याचे पत्र महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना सादर केले. त्यानंतर महापौर सूर्यवंशी, उपमहापौर पाटील तसेच मावळते विरोधी पक्ष नेते साखळकर यांनी संजय मेंढे यांना शुभेच्छा देऊन विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीवर बसवले.यावेळी नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मूळके, अभिजीत भोसले, फिरोज पठाण, शुभांगी साळुंखे, मदिना बारूदवाले यांच्यासह प्रशांत पाटील, अमर निंबाळकर, रवींद्र वळवडे आदी उपस्थित होते.

विकासाच्या दृष्टीने काम करू

नूतन विरोधी पक्षनेते संजय मेंढे म्हणाले, पक्षाच्या सर्व नेत्यांनी विश्वासाने गटनेता तथा विरोधी पक्ष नेता म्हणून जबाबदारी टाकली आहे. महापालिकेच्या सत्तेत ही आम्ही आहोत आधी विरोधी पक्षातही आहोत त्यामुळे दोन्ही भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडू. विकासाच्या दृष्टीने काम करू त्याचबरोबर चुकीच्या गोष्टींना आक्रमकपणे विरोध करू. नेत्यांनी विरोधी पक्षनेते पदाची संधी देण्याचा शब्द दिला होता तो पाळला आहे. पक्षांतर्गत कोणतीही नाराजी तसेच गत तट नाहीत. काँग्रेसचे सर्व नगरसेवक एकत्र आहेत आणि मिळून काम करू. महापालिकेचे महासभा सभागृहात व्हावी यासाठी आग्रह धरणार आहे ऑनलाइन सभेत सविस्तर मुद्दे मानता येत नाहीत त्यामुळे सभागृहातच सर्व मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे त्यादृष्टीने आयुक्तांकडे आग्रह धरणार असल्याचे ते म्हणाले.

loading image
go to top