नगरसेवकांनी वाढवली भाजपची धाकधूक: सांगली महापौर, उपमहापौर निवडीत भरले रंग 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

गोवा सहलीवर जाण्यास काही नगरसेवकांनी नकार दिल्याने भाजपची धाकधुक वाढली आहे. तर भाजपमधील नाराजांना गळ लावण्याचा प्रयत्न कॉंग्रेस आघाडीने चालवला आहे. महापौर, उपमहापौर निवडीवरून भाजपमधील नाराजांवर विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने लक्ष केंद्रित केले आहे.

सांगली : गोवा सहलीवर जाण्यास काही नगरसेवकांनी नकार दिल्याने भाजपची धाकधुक वाढली आहे. तर भाजपमधील नाराजांना गळ लावण्याचा प्रयत्न कॉंग्रेस आघाडीने चालवला आहे. महापौर, उपमहापौर निवडीवरून भाजपमधील नाराजांवर विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने लक्ष केंद्रित केले आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी आज विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांची भेट घेऊन निवडी बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न चालवल्याने महापौर, उपमहापौर निवडीत रंग भरू लागला आहे.

येत्या शुक्रवारी (ता. 7) महापौर व उपमहापौरपदाची निवड होत आहे. त्यासाठी काल (सोमवारी) सत्ताधारी आणि विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपकडून महापौरपदासाठी गीता सुतार व उपमहापौरपदासाठी आनंदा देवमाने यांचे अर्ज दाखल झाले. तर कॉंग्रेसकडून वर्षा निंबाळकर, मनोज सरगर आणि राष्ट्रवादीकडून मालन हुलवान व योगेंद्र थोरात यांचे अर्ज दाखल झाले. 

भाजपकडे दोन सहयोगी सदस्यांसह 43 जणांचे स्पष्ट बहुमत आहे. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे संख्याबळ 35 आहे. उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी उफाळून आल्याने अर्ज दाखल केल्यानंतर सदस्यांना जागेवरच व्हीप हातात देऊन गोवा सहलीवर पाठवले. मात्र सध्या तरी फक्त 25 नगरसेवकच सहलीवर गेले आहेत. काहींनी कामाचे, मुलांच्या परीक्षांचे कारण देत जाणे टाळले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची सूचना आहे, सहलीवर जायला लागतंय, असे त्यांना सांगण्यात येत आहे. काहीजण सायंकाळी गोव्याकडे रवाना झाल्याचे समजते. 

दुसरीकडे कॉंग्रेसकडून भाजपच्या नाराज नगरसेवकांना गळ लावण्याचा प्रयत्न आज सुरू होता. विरोधी पक्षनेते साखळकर, अमर निंबाळकर त्यासाठी फिल्डिंग लावत होते. त्यातच काल नाराज झालेले प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार आज सक्रिय झाले. त्यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांची भेट घेतली. इनामदार व साखळकर यांच्यात निवडी बिनविरोध करण्याबाबत चर्चा झाली. पण साखळकर यांनी कोणतेही आश्वासन दिले नाही. 

कॉंग्रेसचाही व्हीप 
भाजपने अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच सर्व नगरसेवकांना व्हीप बजावला होता. तर विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी आज कॉंग्रेसच्या सर्व 20 नगरसेवकांना व्हीप बजावला. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक शहरातच आहेत. राष्ट्रवादीकडून उद्या (बुधवारी) व्हीप बजाविला जाणार आहे. राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी भाजपच्या नाराज नगरसेवकांनी आपल्याशी संपर्क साधल्याचे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli municipal corporation mayor election at new step