भाजपचे गटनेते युवराज बावडेकर यांचा राजीनामा 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

महापालिकेत अडीच वर्षापूर्वी सत्तांतर होऊन भाजपची स्वबळावर सत्ता आली

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे गटनेते आणि सभागृह नेते युवराज बावडेकर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी आज सकाळी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांच्याकडे राजीनामा सादर केला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ आणि भाजपचे नेते शेखर इनामदार उपस्थित होते. नवीन गटनेता निवड बुधवारी (ता. 27) करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात होत असलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी दिलेल्या राजीनाम्याची महापालिका वर्तुळात चर्चा रंगली. 

महापालिकेत अडीच वर्षापूर्वी सत्तांतर होऊन भाजपची स्वबळावर सत्ता आली. त्यावेळी अनुभवी नगरसेवक म्हणून युवराज बावडेकर यांच्याकडे भाजपच्या नेत्यांनी गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली होती. तर महापौर महिला राखीव असल्याने पहिल्या अडीच वर्षाच्या काळासाठी मिरजेच्या सौ. संगीता खोत आणि नंतर सांगलीच्या सौ. गीता सुतार यांना महापौर पदाची संधी मिळाली. या काळात सभागृहात गटनेते

पदाची जबाबदारी युवराज बावडेकर यांनी सक्षमपणे पार पाडली. 
महापालिकेतील सत्तेचा निम्मा कार्यकाळ संपत आला आहे. पुढील महिन्यात महापौर पदाची निवडणूक होणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव असल्याने युवराज बावडेकर यांच्यासह माजी उपमहापौर धीरज सुर्यवंशी, माजी स्थायी समिती सभापती अजिंक्‍य पाटील, निरंजन आवटी आणि महिला जिल्हाध्यक्षा ऍड. स्वाती शिंदे हे इच्छूक आहेत. त्यामुळे महापौर पदाची संधी कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

महापौर पदाची निवडणूक तोंडावर असताना युवराज बावडेकर यांनी राजीनामा दिल्याने महापालिका वर्तुळात त्यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली. मात्र महापौर निवडीचा आणि गटनेतेपद राजीनाम्याचा काही संबंध नाही असे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, महापालिकेचा निम्मा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे इतर सदस्यांना गटनेतेपदाची संधी मिळावी यासाठी पक्षाने श्री. बावडेकर यांना राजीनामा देण्यास सांगितले. त्यांनी गेल्या अडीच वर्षात गटनेता म्हणून चांगली कामगिरी केली आहे. महापौर निवडीपुर्वी गटनेता निवडणे आवश्‍यक आहे. त्यामुळे नवीन गटनेता निवड बुधवारी (ता. 27) करण्यात येणार आहे. 

हे पण वाचा - मुलांच्या हातात वाहन देणे पालकांना पडणार चांगलेच महागात

 

बुधवारी नवा नेता निवडणार 
सत्ताधारी भाजपचा नवीन गटनेता निवडण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात बुधवारी (ता. 27) सकाळी 11 वाजता भाजपच्या सर्व नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. यावेळी भाजपच्या कोअर कमिटीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये भाजपचा नवीन गटनेता निवडण्यात येणार आहे. 
 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli municipal corporation yuvraj bavdekar