सांगली महापालिकेच्या वीज बिल घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल; 32 लाखांचा अपहार

शैलेश पेटकर
Monday, 23 November 2020

सांगली महापालिकेच्या स्ट्रीट लाईटच्या वीज बिलात तब्बल 31 लाख 83 हजार 510 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्था, एका बॅंकेसह महावितरणचा एक कर्मचारी अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सांगली ः महापालिकेच्या स्ट्रीट लाईटच्या वीज बिलात तब्बल 31 लाख 83 हजार 510 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्था, एका बॅंकेसह महावितरणचा एक कर्मचारी अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्था, एम. डी. पवार पीपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी, महावितरणचा कंत्राटी कर्मचारी ज्ञानेश्‍वर सदाशिव पाटील (वय 29, सांगलीवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महापालिकेचे विद्युत अभियंता अमरसिंह वसंतराव चव्हाण (वय 48, मिरज) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की महापालिकेकडून वीज बिल धनादेशाद्वारे भरले जाते. महावितरणच्या अधिकृत भरणा केंद्रात वीज बिलाचे धनादेश जमा केले जातात. ते धनादेश महावितरणचा कर्मचारी ज्ञानेश्वर सदाशिव पाटील जमा करीत होता. महापालिकेकडून त्याने मे 2019 ते जून 2020 या काळात वीज बिलाचे धनादेश घेतले. त्यानंतर ग्राहक यादीत फेरफार केला. तसेच महापालिकेकडून बिलाचा धनादेश घेऊन तो त्या दोन संस्थांत भरला; मात्र महापालिकेकडे नोंद नसलेले घरगुती, वाणिज्य, औद्योगिक ग्राहकांची ग्राहक क्रमांक, नावे घालून देयके तयार केली आणि महापालिकेच्या पैशांतून त्यांची वीज बिले भरल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. 

बिलांचा भरणाच नाही... 
सर्व संशयितांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमताने स्ट्रीट लाईटच्या बिलाचा भरणा न करता 31 लाख 83 हजार 510 रुपयांचा अपहार करून महापालिकेची फसवणूक केल्याचे चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयितांविरोधात फसवणूक, अपहार केल्याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश बागाव अधिक तपास करीत आहेत. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Municipal Corporation's electricity bill scam case filed; Embezzlement of Rs 32 lakh