महिलांसाठी आता ‘पिंक टॉयलेट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Sangli Municipal Corporation

महिलांसाठी आता ‘पिंक टॉयलेट’

सांगली - अनेक विषय महिला व बाल कल्याण समितीच्या परवानगीशिवाय ‘स्थायी’च्या सभेपुढे प्रशासन आणत असल्याबद्दल महिला व बालकल्याण समितीच्या सभेत महिला सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. अधिकारी सभेस उपस्थित नसतात, या कारणावरून काल महिला सदस्यांनी एक तास सभा तहकूब केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत महिलांसाठी ‘पिंक टॉयलेट’ उभारण्याबाबतचा निर्णय झाला.

आधी स्थायी सभेत विषय मंजूर केले जातात आणि त्यानंतर अवलोकनी महिला व बालकल्याण समितीपुढे आणले जात असल्याबद्दल सदस्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी महापालिका क्षेत्रात महिला व बालकल्याण समितीच्या वतीने खास महिलांसाठी ‘पिंक टॉयलेट’ उभारले जाणार असल्याचा निर्णयही सभेत घेतला.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गीतांजली ढोपे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. या बैठकीत रोहिणी पाटील, अनारकली कुरणे, मोहना ठाणेदार, शुभांगी साळुंखे आदी महिला सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या मंजुरीशिवाय ‘स्थायी’त विषय कसे दिले जातात, असा सवाल काँग्रेस सदस्या रोहिणी पाटील यांनी उपस्थित केला. यावर शहर अभियंता परमेश्‍वर हलकुडे यांनी, महिला समिती विषय मंजूर करायला वेळ लावत असल्याने असे विषय ‘स्थायी’कडे पाठवले जात असल्याचे मत मांडले. यावर सदस्या संतप्त झाल्या. महापालिकेच्या अंदाजपत्रकातील पाच टक्के रक्कम महिला व बालकल्याण समितीसाठी राखीव असते. महिला व बालकल्याण समितीच्या अधिकारात असलेल्या विषयासाठीची रक्कम समितीच्या परवानगीशिवाय खर्ची टाकू नये, असा ठराव झालेला असतानाही प्रशासन हा ठरावच पायदळी तुडवत असल्याबद्दल संतप्त महिलांनी एक तास सभा तहकूब केली.

यानंतर पुन्हा सभा सुरू झाल्यानंतर मिरजेसाठी चिल्ड्रेन पार्कसाठी मंजुरी देण्यात आली. कुपवाडच्या जागेबाबत तांत्रिक अडचण असल्याने या जागेवरचा चिल्ड्रेन पार्कचा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला. पोलिस प्रशासनाला सीसीटीव्हीसाठी ५० लाख रुपये वर्ग करण्यास हरकत नाही. मात्र ते देताना पोलिस प्रशासनाचे पत्र घ्यावे असेल ठरले. मोहना ठाणेदार यांनी महिला व बालकल्याण समितीसाठी निधी कसा खर्च केला जातो, आतापर्यंत समितीसाठी खर्च करण्यात आलेल्या खर्चाची माहिती मागवली.

Web Title: Sangli Municipal Council Meeting Now Pink Toilet For Women

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..