सांगली : का बनलाय राष्ट्रीय ‘मृत्यू’मार्ग ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एअर बॅग’ फुटते तेव्हा!

सांगली : का बनलाय राष्ट्रीय ‘मृत्यू’मार्ग ?

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रत्नागिरी-नागपूरसह राष्ट्रीय महामार्गांवरून आता १२० च्या गतीने वाहने धावण्यासाठी परवानगी दिली जाईल, असे सांगितले आहे. रस्ते चकचकीत, प्रशस्त झाले आहेत. त्याबद्दल शंकाच नाही. गाडी १२० च्या गतीने नक्कीच धावेल, पण अडचण आहे ती त्या गतीत असताना अचानक काही समोर आले, आडवे आले तर ती थांबवता येईल का, आपल्याकडील चालक, इथली शिस्त, महामार्गावरील अवांतर वर्दळ, एकमार्गीची बेशिस्त यावर काय उपाय आहेत की नाही? महामार्ग म्हणजे ‘रेसिंग ट्रॅकॅ’ होता कामा नयेत, याची खबरदारी घ्यावीच लागेल.

‘एअर बॅग’ फुटते तेव्हा!

माझ्याकडे ४० लाखांची गाडी आहे. अपघात झाला तरी ‘एअर बॅग’ आहे. जिवाचा धोका नाही, असा फालतू आत्मविश्‍वास बाळगणारी काही मंडळी घातक आहेत. गाडी प्रचंड वेगाने धावते आणि त्याच वेगाने समोरील वाहनास धडकते, नियंत्रण सुटून झाडाला धडकते तेव्हा ते ‘एअर बॅग’ फुटून कुठे गेले आणि आतील माणसांचे नेमके काय झाले, याचा शोध घ्यावा लागतो. ‘एअर बॅग’ गरजेची आहे, ती कमी किमतीच्या वाहनांतही सक्तीची करावी, मात्र ती आहे म्हणजे बचाव होईल, हे डोक्यातून काढावे लागेल. कित्येक उदाहरणे समोर आहेत. जयसिंगपूर येथील अखंड कुटुंब ‘एअर बॅग’ असूनही उद्ध्वस्त झाले.

चालकांच्या परीक्षा गरजेच्या...

१५ ते ४० लाख रुपयांची महागडी मोटार घ्यायची आणि त्यावर चालक मात्र कमी पगाराचा ठेवायचा...जेवढा पगार तेवढा तो तरबेज भेटणार, हे वेगळे सांगायला नको. त्याला झोप वेळेत मिळाली का, त्याला जेवण वेळेत मिळाले का? कमी पगारामुळे त्याला आर्थिक समस्या, त्यातून कौटुंबिक कलह असे काही विषय होऊ शकतात का, याचे किमान भान वाहन मालकाला असायला हवे. चालकाला डुलकी लागली, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, अशा कारणानेच अधिक अपघात होतात. व्यावसायिक वाहनचालकांसाठी काही परीक्षा गरजेच्या आहेत. त्या अमेरिकेच्य धर्तीवर घ्यायला हरकत नाही.

महामार्ग पोलिस कधी कार्यरत होणार?

रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग नागपूरकडून मिरजेपर्यंत कार्यरत झाला आहे. त्यावर अद्याप टोल सुरू झालेला नाही, सोबत महामार्ग पोलिस व्यवस्थाही अद्याप कार्यरत झालेली नाही. अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण नाही. जिथे गावे आहेत, गावांचे फाटे आहेत, या भागात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

हुतांश गावांसाठी राष्ट्रीय महामार्ग नवाच आहे, तेथे याबाबतची जागृती, रस्ते ओलांडतानाचे नियम, एकमार्गीने न येण्याबाबत सूचना हे सगळे करणे गरजेचे आहे. या मार्गावर जाळीचे कुंपण काही लावता येणार नाही, मात्र पशुपालकांना या मार्गावर येथे जनावरे आणि माणसांसाठी जीवघेणे ठरेल, याची जाणीव करून त्यावर बंदी घालणे गरजेचे आहे.

सांगली जिल्ह्यातून चार राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत आणि पाचवा पुणे-बंगळुरू प्रस्तावित आहे. महामार्गाचे जाळे विकासाला पोषक आहे, मात्र या जाळ्याच्या वेगमोहात अडकून लोक जीवाला मुकत आहेत. गेल्या चार दिवसांत दहा बळी गेले आहेत. महामार्गाला गती आहे, मात्र शिस्त नाही. फलकावरील नियम फाट्यावर मारून लोक बेदरकार वाहने चालवत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणारी सक्षम यंत्रणा उभी नाही. हे मृत्यू मार्ग न ठरोत, याची दक्षता घ्यावी लागेल. या परिस्थितीला अर्थातच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस दल आणि त्यातून अधिक वाहनधारक जबाबदार आहेत.

वाहन पार्किंग करायला महामार्गाच्या कडेला थोडी जागा हवीच. आपल्याकडे महामार्गालगत जागाच नाही. एखादे वाहन बंद पडले तर ते तत्काळ बाजूला नेण्याची व्यवस्था महामार्ग प्राधिकरणाने केली पाहिजे. अर्थात, अवजड वाहनचालकांची जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. यावर व्यापक मोहीम गरजेची आहे.

जिल्हाध्यक्ष, वाहतूकदार संघटना

नव्या महामार्गावर हे घातक

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर उलट्या दिशेने वाहने धावतात

मिरज-पंढरपूर मार्गावर स्थानिकांना राष्ट्रीय महामार्गाच्या वेगाचे भान नाही

शेळ्या, मेंढ्या, जनावरे रस्त्यावर बेफिकीरीने आणली जाताहेत

नव्या चालकांना, स्थानिकांना ‘लेन’ची माहितीच नाही

आठ दिवसांतील बळी

कासेगावला एकाच कुटुंबातील - ५ जणांचा मृत्यू

जत तालुक्यात दुचाकी घसरून - ३ जणांचा मृत्यू

नागजजवळ मोटार-ट्रक अपघातात - २ जणांचा मृत्यू

केरेवाडीत तिहेरी अपघातात - १ बालक ठार

विभूतवाडीत दोन वाहनांच्या धडकेत - २ ठार

जुने महामार्ग, समस्या त्याच

पुणे-बंगळुरू महामार्गाच्या कडेला वाहनांचे धोकादायक पार्किंग

वेगावर मर्यादा ठेवण्यासाठीची नियंत्रण व्यवस्थाच नाही

रस्ता ओलांडणाऱ्यांना धोक्याचे भान नाही

कंटेनर, अवजड वाहनांचा बेदरकार, बेशिस्तपणा जीवघेणा

Web Title: Sangli National Highways Passing Death Route

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top