जतमध्ये नेत्यांची फौज उतरली तरी भाजप हारली 

प्रदीप कुलकर्णी
सोमवार, 11 डिसेंबर 2017

जत : थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडीत कॉंग्रेसने बाजी मारून भाजपला दे धक्‍का दिला. विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपची सुरू असलेल्या विजयाची घौडदौड रोखण्यात कॉंग्रेसला यश आले. यानिमित्ताने शहरातील भाजपची ताकद वाढली आहे, राष्ट्रवादीपुढे मात्र धर्मसंकट उभे राहिले आहे. 
जनतेचा कौल पाहता तिघांनाही समान संधी मिळाल्याचे चित्र आहे. एकूणच जत पालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकला असला तरी दोरी मात्र लटकती आहे. 

जत : थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडीत कॉंग्रेसने बाजी मारून भाजपला दे धक्‍का दिला. विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपची सुरू असलेल्या विजयाची घौडदौड रोखण्यात कॉंग्रेसला यश आले. यानिमित्ताने शहरातील भाजपची ताकद वाढली आहे, राष्ट्रवादीपुढे मात्र धर्मसंकट उभे राहिले आहे. 
जनतेचा कौल पाहता तिघांनाही समान संधी मिळाल्याचे चित्र आहे. एकूणच जत पालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकला असला तरी दोरी मात्र लटकती आहे. 

जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जत नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडीत कॉंग्रेसच्या शुभांगी बन्नेनवर यांनी भारतीय जनता पक्षाच्या रेणुका आरळी यांचा पराभव करीत दे धक्‍का दिला. नगरसेवकांच्या निवडीत मात्र भारतीय जनता पक्षाचे सात नगरसेवक निवडून आल्याने त्यांची ताकद वाढली आहे. कॉंग्रेसचे सहा व राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक निवडून आले. तर एका जागेवर बसपाचा हत्ती चालला. 

पालिकेचा निकाल पाहता 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची सुरू असलेली विजयाची घौडदौड रोखण्यात कॉंग्रेसला यश आले. सात नगरसेवक आल्याने शहरात भाजपची ताकद वाढली आहे. मात्र केंद्र व राज्यात सरकार, मोदी लाट ऐवढेच नव्हे तर आमदारही भाजपचा आहे. निवडणूक मंत्री, खासदार व आमदारांच्या प्रचार सभेने व भेटीगाठीने वातावरण भाजपमय झाले होते. मात्र याचे मतात रूपांतर करण्यात भाजप कमी पडला.

कॉंग्रेसची भिस्त माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या एकट्यावर होती. शांतपणे व अनुभवाचा वापर करता डॉ. कदम यांनी भाजपला धक्‍का देऊन यश मिळविले. हे यश जिल्हा बॅंकेचे संचालक विक्रम सावंत यांचा आत्मविश्‍वास वाढवणारा तर आहेच शिवाय येणाऱ्या काळात त्यांची राजकीय ऊर्जा ठरणार आहे. शहरावर जास्तीत जास्त काळ अधिराज्य केलेले सुरेश शिंदे बॅकफूटवर आले. निवडणुकीच्या तोंडावर नव्या पक्षात गेले. त्याचे जुने दिग्गज साथीदार त्यांना सोडून गेल्याने एकाकी पडलेल्या राष्ट्रवादीने नव्या कार्यकर्त्यांना घेऊन ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. येथे आमदार जयंत पाटील यांचा मुत्सद्दीपणा कामी आला नाही. सुरेश शिंदे यांची शक्‍तीही मुलगा स्वप्नील याला नगरसेवक करण्यात गेली. त्यामुळे राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही. जनतेचा कल पाहता सर्वांना समान संधी मिळाली आहे. नगराध्यक्षपद आल्याने कॉंग्रेसचा झेंडा पालिकेवर फडकला. मात्र त्रिशंकू अवस्था झाल्याने दोरी लटकती राहिली. आता पालिकेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी चढाओढ लागणार आहे. सत्तेची दोरी सुरेश शिंदे यांच्या हातात आहे.

सुरेश शिंदे व विलासराव जगताप यांची मैत्री सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे शिंदे व जगताप एकत्रित येतील असा होरा आहे. परंतु त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांच्या रिमोट कंट्रोल जयंत पाटील यांच्याकडे आहे. सध्या राज्यात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात हल्लाबोल सुरू आहे, अशा परिस्थितीत युती केल्यास राज्यभर वेगळा संदेश जाणार आहे. तसेच जिल्ह्यात नेतृत्व करणाऱ्या जयंत पाटील यांच्या विरोधात भाजपने लावलेली फिल्डिंग सर्वज्ञात आहे. त्यामुळे सुरेश शिंदे धर्मसंकटात सापडले आहेत. ते काय करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

जयंत पाटलांची ताकद आणि चर्चा.... 
विलासराव जगताप राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेल्यानंतर येथील राष्ट्रवादीची ताकद क्षीण झाली होती. मात्र सुरेश शिंदेंनी राष्ट्रीवादीत प्रवेश केल्याने जयंत पाटील यांना येथे मोठा दिलासा मिळाला होता. मात्र सुरेश शिंदेंनी एकाकी लढत येथे सहा जागा जिंकल्या आहेत. अर्थात जतमध्ये सत्तेचे मेतकुट कसे जमवणार? असा तिढा निर्माण झाला आहे. कारण शिंदे व सावंत यांचे पटत नाही.  मात्र जगताप व शिंदे जुने मित्र आहेत. अर्थात जयंत पाटील यांचा सध्याचा भाजप विरोध पाहता ते कॉंग्रेसशी जमवून घेण्याचा सल्ला देणार की याबाबत निर्णयाचे अधिकार शिंदेंनाच देणार याबाबत पत्ते गुलदस्त्यात आहेत. एकूणच जयंत पाटील यांनी येथे आणखी ताकद लावली असती तर चित्र वेगळे दिसले असते अशीही चर्चा आहे. 

Web Title: Sangli News Jat Nagarpalika Election