मराठा समाजाचा मुंबईतील मोर्चा शेवटचा - महाडिक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 August 2017

सांगली - मराठा समाज आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईत बुधवारी (ता. ९) काढण्यात येणारा मोर्चा शेवटचा असेल. राज्यभरातून दोन कोटी समाज जमेल. त्या दिवशी संपूर्ण मुंबईतील सर्व व्यवहार थांबतील, अशी माहिती अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यापुढे अन्य पर्यायांचा विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, मराठा समाज आरक्षण मागणीसाठी आजअखेर ५८ मूक मोर्चे काढण्यात आले. मुंबई मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर सहा विभागांत प्रमुख १७ बैठका झाल्या. समाजाच्या समन्वय समितीत ३४ संघटनांचा समावेश आहे. मराठा आरक्षण प्रश्‍न न्यायप्रविष्ट असला, तरी तो सोडविण्यासाठी राज्य शासनाचा पाठपुरावा महत्त्वाचा आहे. 

ॲट्रॉसिटी कायद्यात दुरुस्तीची गरज आहे. एकतर्फी निर्णय होऊ नये म्हणून राज्यातील सर्व ॲट्रॉसिटी समित्यांत मराठा समाजाचे दोन प्रतिनिधी घेण्यास सरकार तयार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला दहा हजार कोटीचा निधी मिळावा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा, हमीभाव मिळावा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसाला शासकीय नोकरीत घ्यावे, मुंबईतील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे, समाजातील मुलांना शिक्षण शुल्कमाफी, छत्रपती शाहू महाराज कौशल्य विकास कार्यक्रम राबवावा आणि गडकिल्ले संवर्धनासाठी ५० हजार कोटींची तरतूद करावी, या मागण्यांचा समावेश आहे.
ते म्हणाले, ‘‘समाजबांधवांनी रविवार (ता. ६)पासूनच मुंबईला जाण्यासाठी निघावे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान या सहा किलोमीटर मार्गावर मोर्चा असेल. मुंबईला जाण्यासाठी रेल्वे मोफत आहे. समाजातील लोकप्रतिनिधी आणि लोक स्वतः चारचाकी गाड्यांनी जातील. शासनाने त्यांना टोलमाफी दिली आहे. ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, नाश्‍त्याची सोय केली आहे. पावसाची शक्‍यता गृहीत धरून छत्री, रेनकोट सोबत घ्यावेत.’’ अमोल पाटील, बी. जी. शिंदे, प्रमोद जाधव, सुयश पाटील, निवास पाटील, संतोष शिंदे, गजानन पाटील, आकाश नांगरे उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli news Maratha community's last rally in Mumbai